कोरोनाच्या तिसऱया लाटेच्या पार्श्वभूमीवर करणार चर्चा
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशातील वाढत्या कोरोना आणि ओमिक्रॉन संसर्गाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया सोमवारी विविध राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. आरोग्य मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱयांकडून यासंबंधी रविवारी माहिती देण्यात आली. या व्हर्च्युअल ‘संवादा’मध्ये कोविड प्रोटोकॉल, तात्पुरती रुग्णालये बांधणे आणि कोविड प्रतिबंधक लसीकरणासाठी सूचना दिल्या जाऊ शकतात. तसेच सोमवारपासून सुरू होणाऱया बूस्टर डोससंबंधीही महत्त्वपूर्ण दिशानिर्देश दिले जाऊ शकतात.
देशात कोरोना महामारीच्या तिसऱया लाटेत प्रथमच संसर्गाच्या संख्येने दीड लाखांचा टप्पा ओलांडला आहे. शनिवारच्या 24 तासात देशात एकूण 1 लाख 59 हजार 632 नवे बाधित समोर आले आहेत. तसेच 327 लोकांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी 40,863 उपचाराधीन रुग्ण कोरोनामुक्त झाले असले तरी डिस्चार्ज मिळणाऱया रुग्णांपेक्षा नव्या बाधितांचा आकडा जवळपास चौपट असल्यामुळे सक्रिय रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे.
हॉस्पिटलायझेशन दर तिसऱया लाटेमध्ये कमी
जागतिक पातळीवरील ओमिक्रॉनचा संसर्ग आणि गेल्या 5 आठवडय़ांतील देशातील संसर्गस्थितीच्या अभ्यासानुसार बहुसंख्य बाधित सौम्य किंवा लक्षणे नसलेले आहेत. सौम्य लक्षणांमुळे रुग्णालयात दाखल होणाऱयांचे प्रमाण कमी आहे. तसेच रुग्णालयात दाखल केलेल्या बहुतेक जणांचे वय 60 वर्षांपेक्षा जास्त आहे, असे कोरोनाच्या राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गटाचे अध्यक्ष डॉ. अरोरा यांनी रविवारी सांगितले. सध्या हॉस्पिटलायझेशन दर फक्त 1-2 टक्के इतका आहे. यापूर्वीच्या डेल्टा लाटेवेळच्या हॉस्पिटलायझेशन दरापेक्षा हा आकडा खूपच कमी आहे.
देशात सक्रिय रुग्ण 6 लाखांसमीप
देशात सध्या सक्रिय रुग्णांचा आकडा जवळपास 6 लाखांसमीप आहे. आरोग्य मंत्रालयाकडून रविवारी सकाळी जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, देशातील सक्रिय रुग्णसंख्या 5 लाख 90 हजार 611 इतकी आहे. तसेच एकूण बाधितांचा आकडा 3 कोटी 55 लाख 28 हजार 4 इतका झाला आहे. एकूण बाधितांपैकी 3 कोटी 44 लाख 53 हजार 603 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 4 लाख 83 हजार 790 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नवे बाधित सापडणाऱयांमध्ये महाराष्ट्र (41 हजार 434), दिल्ली (20 हजार 181) आणि बंगाल (18 हजार 802) ही तीन राज्ये आघाडीवर असून सर्वाधिक रुग्ण सापडणाऱया दहा राज्यांमध्ये 1.26 लाखांहून अधिक लोक संसर्गाच्या विळख्यात आले आहेत.
ओमिक्रॉनबाधितांचा आकडा 3,623 वर
देशात ओमिक्रॉनची प्रकरणेही वेगाने वाढत आहेत. गेल्या 24 तासात 552 नवीन ओमिक्रॉन रुग्ण आढळले आहेत. नव्या बाधितांमुळे देशातील ओमिक्रॉन रुग्णांची एकूण संख्या 3,623 वर पोहोचली आहे. त्याचवेळी, या प्रकाराची लागण झालेले 1,409 रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत.









