बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने बेड आणि ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. दरम्यान, राज्याचे आरोग्य व वैद्यकीय शिक्षण मंत्री डॉ. के. सुधाकर यांनी कोरोना साथीच्या दुसर्या लहरीला सामोरे जाण्यासाठी स्थानिक पातळीवर उत्पादित केल्या जाणाऱ्या ऑक्सिजनच्या वापरास परवानगी द्यावी, अशी विनंती केंद्र सरकारकडे मंगळवारी केली.
मंत्री सुधाकर यांनी माध्यमांशी बोलताना राज्य सरकारने जास्तीत जास्त ऑक्सिजनचे वाटप करण्यासाठी केंद्र सरकारला विनंती केली आहे. केंद्र सरकारने मंगळवारी सहा कंटेनरमध्ये १२० टन द्रव वैद्यकीय ऑक्सिजनचा पुरवठा केला आहे. राज्यात निर्माण होणार्या ऑक्सिजनच्या वापरास परवानगी दिली गेली तर वाहतुकीची अडचण होणार नाही. रेल्वेने ऑक्सिजन पोहोचण्यासाठी किमान चार दिवस लागतात. सरकार लवकरच अतिरिक्त १२५-१५० टन ऑक्सिजन पुरवणार आहे. ऑक्सिजन उपलब्ध होत नसल्याने रुग्णांवर उपचार करण्यास अडचणी येत आहेत. ऑक्सिजन अभावी राज्यात अनेक रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. त्यामुळे रुग्णांना वेळेत ऑक्सिजन पुरवठा व्हावा यासाठी केंद्राने स्थानिक पातळीवर उत्पादित होणाऱ्या ऑक्सिजन वापरास परवानगी द्यावी.
राज्यातील रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरच्या कमतरतेबद्दल बोलताना मंत्री सुधाकर यांनी, सक्रिय रूग्णांची संख्या व मागणीनुसार ऑक्सिजन पुरवठा केला जात आहे. जिल्हा पातळीवरील अधिकारी नियमितपणे परिस्थितीची माहिती शेअर करत असतात. यासाठी वॉर रूम कार्यरत आहे. दक्षिण कन्नड जिल्ह्यात आधीपासूनच दीडशे व्हेंटिलेटर आहेत. सरकार अतिरिक्त ३० व्हेंटिलेटर पाठवित आहे. हसन जिल्ह्यात ५० व्हेंटिलेटर पाठविण्यात येणार आहेत.