ऑनलाईन टीम
केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी महाराष्ट्रातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना 701 कोटींची मदत दिल्याचे जाहीर केले. लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना कृषीमंत्र्यांनी ही माहिती दिली. राज्यात जून ते ऑक्टोबर 2020 मध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले होते. यावेळी राज्य सरकारने केंद्राकडे मदतीची मागणी केली होती. आज लोकसभेत कृषीमंत्री तोमर यांनी मदत जाहीर केली. त्यानंतर राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांनी केंद्राचे आभार मानले आहेत.
राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधीतून जून ते ऑक्टोबर २०२० मध्ये महाराष्ट्रात आलेल्या पूरासाठी ७०१ कोटी रुपये मंजूर केल्याची माहिती केंद्र सरकारने दिली. शिवसेनेचे उस्मानाबादचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी गतवर्षीच्या नुकसानाबद्दल लोकसभेत प्रश्न विचारला होता, त्यावर केंद्रीय कृषी मंत्र्यांनी मदत जाहीर केली. परंतु, गतवर्षीच्या अतिवृष्टीनंतर राज्य सरकारने केंद्राकडे 3 हजार 721 कोटींची मागणी केली होती. या मागणीपैकी 701 कोटी रुपये देण्याचे आज केंद्र सरकारने घोषित केले आहे, असे भुसे यांनी सांगितले. तसेच या काळात राज्य सरकारने 4 हजार 375 कोटींची मदत शेतकऱ्यांना दिल्याचेही त्यांनी सांगितले.
पीक विमा योजनेंतर्गत देणार मदत
महाराष्ट्रातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना केंद्र सरकारने 701 कोटींची मदत जाहीर केली आहे. ही मदत पीक विमा योजनेतून दिली जाणार आहे, अशी माहिती कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी दिली. केंद्र सरकारने बनवलेल्या आंतर मंत्रालयीन समितीच्या अहवालानुसार ही मदत देण्यात आल्याचेही तोमर यांनी सांगितले.
सध्याच्या नुकसानीसाठीही मदतीची विनंती
गेल्या काही दिवसांत राज्यातील कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे नद्यांना महापूर आला. यामध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यासंदर्भात राज्य सरकारतर्फे केंद्राला आर्थिक मदतीची विनंती करणार असून केंद्र सरकार याची योग्य ती दखल घेवून तातडीने मदत करेल, अशी अपेक्षा राज्याचे कृषी मंत्री भुसे यांनी व्यक्त केली आहे.
Previous Articleविना परवाना लाकूडी कोळसा वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई
Next Article खानापूरच्या नगराध्यक्षपदी स्वाती टिंगरे बिनविरोध









