वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्ग हे जवळपास दोन वर्षापासून आपल्या लोकप्रिय ठरलेल्या मेसेजिंग ऍप व्हॉट्सअपवर पेमेंट सुविधा देण्याचा प्रयत्न करत होते. परंतु याबाबत कंपनीला पूर्ण सर्व्हिस देता आलेली नाही. याच काळात अल्फाबेट इंकचे गुगल पे, वॉलमार्ट इंकचे फोन पे आणि सॉफ्टबँकेचे गुप कॉर्पचे पेटीएम यांनी भारतात पेमेंट ऍप बाजारात आपला दबदबा निर्माण केला आहे. याच स्पर्धेत आता टक्कर देण्यासाठी व्हॉट्सअपची कॅशलेश पेमेंट ऍप सुविधा लवकरच कार्यान्वीत होण्याचे संकेत आहेत.
प्रत्येकाच्या घरात स्मार्टफोन उपलब्ध असल्यामुळे ज्या सुविधा बँकांच्या विविध शाखा देऊ शकत नाहीत त्या ऑनलाईन पेमेंट ऍप देत आहेत. आगामी काळात प्रत्येकजण चालता बोलता बँकिंग ऍपधारक होणार असल्याचे आर्थिक अभ्यासक म्हणत आहेत.
कॅशलेश व्यवहारामुळे ग्राहकांना कोणत्याही ठिकाणी न जाता आपला व्यवहार सुरक्षित घरबसल्या करण्याची संधी उपलब्ध होते. येत्या काळात व्हॉट्सअप ही संधी यशस्वीपणे सकारात्मकपणे पेलू शकणार असल्याचा विश्वास तज्ञाकडून व्यक्त केला जात आहे. कारण भारतीय अर्थव्यवस्था विकासाकडे वाटचाल करणारी असल्यामुळे व्हॉट्सअप पेमेंट ऍप शहरी आणि ग्रामीण भागातील ग्राहकांना महत्वपूर्ण सेवा देऊ करेल, असेही म्हटले जात आहे.
मान्यता आवश्यक
व्हॉट्सअप पेमेंट ऍप सुरु करण्यासाठी नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची मान्यता आवश्यक आहे. यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेकडून निश्चित करण्यात आलेल्या नियम व अटी यांच्या आधीन राहून ही सेवा सुरु करावी लागणार असल्याचे म्हटले आहे.









