अलेक्झांडर व्हेरेव्ह, होल्गर रुने उपांत्यपूर्व फेरीत, पावल्युचेन्कोव्हा, स्विटोलिना डिमिट्रोव्ह पराभूत
वृत्तसंस्था/ पॅरिस
झेक प्रजासत्ताकच्या कॅरोलिना मुचोव्हाने माजी उपविजेत्या अॅनास्तेशिया पावल्युचेन्कोव्हाचे आव्हान संपुष्टात आणत फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला तर बेलारुसच्या आर्यना साबालेन्कानेही उपांत्य फेरी गाठली आहे. याशिवाय जर्मनीचा अलेक्झांडर व्हेरेव्हृ, डेन्मार्कचा होल्गर रुने, महिला अग्रमानांकित पोलंडची इगा स्वायटेक यांनी एकेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठली.
मुचोव्हाने पावल्युचेन्कोव्हववर 7-5, 6-2 अशी मात करीत सर्वप्रथम या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. कारकिर्दीत पहिल्यांदाच तिने या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली आहे. तिची पुढील लढत बेलारुसची द्वितीय मानांकित आर्यना साबालेन्काशी होईल. बिगरमानांकित मुचोव्हाने पहिल्याच फेरीत आठव्या मानांकित मारिया सॅकेरीला पराभवाचा धक्का दिला होता. पहिल्या सेटमध्ये पावल्युचेन्कोव्हाने कडवा प्रतिकार केला. पण हा सेट मुचोव्हानेच जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये पावल्युचेन्कोव्हाचा प्रतिकार ढिला पडला आणि मुचोव्हाने झटपट हा सेट संपवून विजय साकार केला. बेलारुसच्या साबालेन्काने युक्रेनच्या इलिना स्विटोलिनाचा 6-4, 6-4 असा पराभव केला.
स्वायटेकला पुढे चाल
पोलंडच्या अग्रमानांकित इगा स्वायटेकला पुढे चाल मिळाल्याने तिला उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळाले. चौथ्या फेरीच्या लढतीत युक्रेनच्या लेसिया त्सुरेन्कोने आजारपणामुळे माघार घेतल्याने स्वायटेकला पुढे चाल मिळाली. त्सुरेन्को तब्बेत बरी नसतानाही पहिल्या सेटमध्ये खेळण्यास उतरली. स्वायटेक 5-1 असे पुढे असताना त्सुरेन्कोने त्रास होऊ लागल्याने माघार घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर पंचांनी स्वायटेकला विजयी घोषित केले. स्वायटेकने आता सलग 11 सामने जिंकले आहेत. स्वायटेकची पुढील लढत अमेरिकेच्या कोको गॉफशी होणार आहे.
डिमिट्रोव्ह पराभूत
पुरुष एकेरीत जर्मनीच्या 22 व्या मानांकित अलेक्झांडर व्हेरेव्हने बल्गेरियाच्या ग्रिगोर डिमिट्रोव्हचे आव्हान 6-1, 6-3, 6-4 असे संपुष्टात आणत उपांत्यपूर्व फेरी गाठली. कारकिर्दीत ग्रँडस्लॅमची नवव्यांदा व येथे पाचव्यांदा त्याने उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. अन्य एका सामन्यात एचेव्हेरीने 27 व्या मानांकित योशिहितो निशिओकाचा 7-6 (10-6), 6-0, 6-1 असा पराभव करून आगेकूच केली. डेन्मार्कच्या होल्गर रुनेने पहिल्यांदाच या स्पर्धेत पाच सेट्सचा सामना खेळला. सहाव्या मानांकित रुनेने फ्रान्सिस्को सेरुंडोलोवर 7-6 (7-3), 3-6, 6-4, 1-6, 7-6 (10-7) अशी संघर्षपूर्ण लढतीत मात केली. चार तास ही लढत रंगली होती. रुनेची पुढील लढत कॅस्पर रुडशी होणार आहे.