प्रतिनिधी / बेळगाव :
संततधार पावसामुळे बुधवारी कॅम्प येथील ऑफीसर्स मेस समोरील तिमय्या रोडवर गुलमोहराचा वृक्ष उन्मळून पडला. या रस्त्यावर फारशी वर्दळ नसते. शिवाय रात्रीची वेळ असल्याने वर्दळ कमी होती. त्यामुळे सुदैवाने कोणतीही दुर्घटना घडली नाही. तथापि, कॅन्टोन्मेंट बोर्डचे सदस्य साजीद शेख यांच्या पुढाकाराने झाडाचा अडथळा दूर करण्यात आला.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, सततच्या पावसाने वृक्ष कोसळला. तेंव्हा जवळच राहणाऱया रंजन शेट्टी यांनी साजीद शेख यांना त्याची कल्पना दिली. साजीद यांनी भाऊ साबीर व मुलगा अर्फात यांच्यासह घटनास्थळी जाऊन कटरच्या सहाय्याने झाडाच्या बुंध्याचा वरचा भाग व फांद्या कापल्या. त्यांना रंजन शेट्टी व डॉ. जरीर रतनजी यांचेही सहकार्य लाभले.
झाडाच्या कापलेल्या फांद्या रस्त्यावरुन हटविण्यासाठी साजीद यांनी लष्करी अधिकारी कर्नल मनोज शेट्टी यांच्या संपर्क साधला. त्यांनी त्वरीत मराठा लाईट इन्फंट्रीच्या काही जवानांना घटनास्थळी पाठविले. जवानांच्या मदतीने साजित शेख व सर्वांनी मिळून झाडाच्या फांद्या व बुंदा रस्त्यावरुन हटवून रस्ता खुला केला.









