कत्तलखान्या पाठोपाठ कॅन्टोन्मेंटची कारवाई, बिफ मार्केट बंद करण्यास व्यवसायिकांचा आक्षेप
प्रतिनिधी/ बेळगाव
कॅन्टोन्मेंट परिसरातील कत्तलखाने बंद करण्याची नोटीस प्रदूषण नियंत्रण मंडळाने बजावली होती. याची दखल घेऊन जनावरांचा कत्तलखान्याला टाळे ठोकण्यात आले आहेत. या पाठोपाठ मटण मार्केट, पोर्क मार्केट आणि बिफ मार्केटमधील कत्तलखाने बंद करण्याची तयारी कॅन्टोन्मेंट बोर्डने चालविली आहे. मात्र याला मांस विपेत्यांनी आक्षेप घेतला असून, कत्तलखाने बंद करू नये अशा मागणीचे निवेदन कॅन्टोन्मेंट बोर्डला दिले आहे.
कॅन्टोन्मेंट बोर्डची सर्वसाधारन बैठक बुधवार दि. 27 रोजी सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आली आहे. यावेळी चर्चा करण्यासाठी मांस विपेत्यांनी दिलेल्या निवेदनाचा विषय कॅन्टोन्मेंट बोर्डच्या बैठकीच्या अजेंडय़ावर घेण्यात आला आहे. त्यामुळे याकडे व्यवसायिकांचे लक्ष लागले आहे. कॅन्टोन्मेंट हद्दीतील कत्तलखान्यातील सांडपाणी गटारीमध्ये व नाल्यामध्ये सोडण्यात येते. त्यामुळे प्रदूषणाचा धोका वाढला आहे. कत्तलखान्यामध्ये सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्याची सूचना करण्यात आली होती. मात्र याची अंमलबजावणी झाली नाही. तसेच लोकवस्तीमध्ये असलेले कत्तलखाने नागरिकांसाठी धोकादायक आहेत. त्यामुळे लोकवस्तीमधील कत्तलखाने बंद करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने बजावला आहे. त्यानुसार प्रदूषण नियंत्रण मंडळाने कॅन्टोन्मेंट बोंर्डला 17 जून रोजी नोटीस बजावून कत्तलखाने बंद करण्याची सूचना दिली होती. त्यानुसार रामघाटरोड येथील कत्तलखाना बंद करून टाळे ठोकण्याची कारवाई यापूर्वी करण्यात आली आहे. पण कॅम्पमधील मटण मार्केट, बिफ मार्केट आणि पोर्क मार्केट येथील कत्तलखाने देखील बंद करण्याबाबत कॅन्टोन्मेंट बोर्डने प्रदूषन नियंत्रण मंडळाला पत्र पाठवून स्पष्टीकरण विचारले होते. त्यामुळे कॅन्टोन्मेंट कायद्यानुसार सदर कत्तलखाने देखील बंद करण्याची सूचना करण्यात आली आहे. त्यामुळे बिफ मार्केट, पोर्क मार्केट आणि मटण मार्केटमधील गाळे भाडे तत्वावर देण्याचा प्रस्ताव रद्द करण्यात आला आहे.
जनावरांचा कत्तलखाना बंद करण्या पाठोपाठ आता मटण मार्केट व बिफ मार्केटमधील कत्तलखाना बंद करण्याची तयारी कॅन्टोन्मेंटने चालविली आहे. पण सदर कारवाईस मांस विपेत्यांनी आक्षेप घेऊन दि. 18 ऑगस्ट रोजी बिफमार्केटमधील गाळेधारकांनी कॅन्टोन्मेंट बोर्डला निवेदन दिले आहे. कोरोना विषाणुच्या प्रसारामुळे मागील चार महिन्यापासून लॉकडाऊन करण्यात आले होते. परिणामी आर्थिक परिस्थिती बिकट बनली आहे. आमचे व्यवसाय बंद असल्याने कर्ज भरणे तसेच अन्य कामे रखडली आहेत. अशा स्थितीत गाळे भाडेतत्वावर देण्याचे रद्द केल्यास बेरोजगारीची वेळ येणार आहे. बिफ मार्केटमध्ये व्यवसाय करणाऱया कुटुंबांचा उदरनिर्वाह करणे कठिण आहे. त्यामुळे लीज वाढवून द्यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. त्यामुळे हा विषय कॅन्टोन्मेंट बोर्डच्या बैठकीच्या अजेंडय़ावर घेण्यात आला आहे. कुटुंबांचा उदरनिर्वाह या व्यवसायावर चालत असल्याने याबाबत कॅन्टोन्मेंट बोर्ड कोणता निर्णय घेणार याकडे मांस विकेत्यांचे लक्ष लागले आहे.









