कॅम्प पोलीस स्थानक होणार सीलडाऊन
प्रतिनिधी / बेळगाव
पिस्तुलाचा धाक दाखवून दागिने लुटल्या प्रकरणी गेल्या पाच दिवसांपूर्वी कॅम्प पोलिसांनी अटक केलेल्या तरुणाला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे पोलिसांची धास्ती वाढली असून कॅम्प पोलीस स्थानक सीलडाऊन करण्याची तयारी सुरु झाली आहे. सध्या हा तरुण हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात असून कारागृहातही खळबळ माजली आहे.
29 जून रोजी कॅम्प पोलिसांनी 29 वषीय तरुणाला गावठी पिस्तुल व तीन जीवंत काडतुसासह अटक केली होती. त्याची रवानगी हिंडलगा येथील मध्यतर्वी कारागृहात करण्यात आली होती. शुक्रवारी त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे एकच खळबळ माजली आहे.
डीसीपी, एसीपी, पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱयांनी त्याची चौकशी केली होती. त्यामुळे तेही धास्तावले असून संपूर्ण कॅम्प पोलीस स्थानकाला टाळे ठोकण्याची तयारी सुरु झाली आहे. गुरुवारी राज्य राखीव दलाच्या मच्छे येथील पोलीसाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्या पाठोपाठ शुक्रवारी आरोपीला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.









