प्रतिनिधी/ चिपळूण
पूरमुक्त चिपळूणसाठी 10 दिवसांपासून सुरू असलेल्या नागरिकांच्या साखळी उपोषणाची पुढील दिशा बुधवारी होणाऱया राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीवर अवलंबून आहे. मंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनानुसार या बैठकीत गाळासंदर्भात ठोस निर्णय झाल्यास उपोषण मागे घेतले जाईल. मात्र अपेक्षित निर्णय न झाल्यास दोन्ही विरोधी पक्षनेत्यांसह भाजपाचे नेते चिपळूणकरांच्या पाठिंब्यासाठी मैदानात उतरणार आहेत.
वाशिष्ठीसह उपनद्यातील गाळ उपशासाठी येथील प्रांत कार्यालयासमोर गेल्या आठवडय़ापासून नागरिकांचे बेमुदत साखळी उपोषण सुरू आहे. सोमवारी या संदर्भात महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, बंदरे विकास मंत्री असलम शेख, जलसंपदा मंत्री जयंत, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, पालकमंत्री ऍड. अनिल परब यानी चिपळूण बचाव समितीबरोबर झालेल्या बैठकीत गाळ प्रश्न गंभीर असल्याचे सांगत बुधवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार या बैठकीकडे चिपळूणवासियांच्या नजरा लागल्या आहेत. गाळ काढण्यासाठी 160 कोटीची गरज असल्याने त्या तुलनेत निधीची तरतूद झाली तर उपोषण मागे घेतले जाणार आहे, अन्यथा लढा तीव्र केला जाणार आहे.
दरम्यान, माजी आमदार व भाजपाचे प्रदेश सरचिटणीस प्रमोद जठार यांनी या संदर्भात चर्चेसाठी निमंत्रण दिल्यानुसार सोमवारी समितीचे अरुण भोजने, सतीश कदम, राजेश वाजे, शहानवाज शहा, किशोर रेडीज यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची भेट घेतली. दरेकर यांनीही या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला असून तसे पत्र समितीकडे दिले आहे. यावेळी दरेकर म्हणाले की, आपली मागणी योग्य असून शहराला वाचवण्यासाठी गाळ काढावाच लागेल. आपण याकडे सरकारचे लक्ष निश्चितच वेधू. भाजप या लढय़ात आपल्यासोबत असल्याचे त्यांनी सांगितले. आमदार प्रसाद लाड दोन दिवसांत उपोषणस्थळी भेट देणार आहेत. त्यानंतर विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपोषणस्थळी भेट देऊन लढय़ाला पाठिंबा देणार आहेत.
उपमुख्यमंत्र्यांनीही आज बोलावली बैठक
चिपळूणातील पूर परिस्थितीसंबंधी उपाययोजनांदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 15 डिसेंबर रोजी दुपारी 2 वाजता मंत्रालयात संबंधित 11 मंत्री, सचिव, खासदार, आमदार यांची एकत्रित बैठक आयोजित केली आहे. बैठकीला जलसंपदा मंत्री जयंत पाटील, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, उर्जामंत्री नितीन राऊत, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, पालकमंत्री अनिल परब, बंदरे विकास मंत्री असलम शेख, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मदत व पुनर्वसन मंत्री प्राजक्त तनपुरे, खासदार विनायक राऊत, आमदार भास्कर जाधव, शेखर निकम, नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांच्यासह नियोजन, वित्त, सार्वजनिक बांधकाम, बंदरे, महसूल, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव तसेच उर्जा विभागाचे प्रधान सचिव, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मेरीटाईम बोर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्याधिकारी, चिपळूण बचाव समिती पदाधिकाऱयांना निमंत्रित करण्यात आले आहे.









