सियाचीनमध्ये पहिल्या महिला लष्करी अधिकारी तैनात : वयाच्या 11 व्या वर्षी गमावले पितृछत्र
वृत्तसंस्था/ सियाचीन
आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या अगोदर कॅप्टन शिवा चौहान हे नाव बरेच चर्चेत आले आहे. पॅप्टन शिवा या महिला अधिकाऱ्याने आज आपल्या मेहनतीच्या जोरावर नवी उंची गाठली आहे. सियाचीन बॅटल स्कूलमध्ये इतर जवानांसोबत प्रशिक्षण घेतल्यानंतर पॅप्टन शिवा चौहान या जगातील सर्वात उंच युद्धभूमी असलेल्या सियाचीन येथे कार्यरत असलेल्या पहिल्या महिला अधिकारी बनल्या आहेत.
कॅप्टन शिवा चौहान यांच्या कामगिरीची सध्या देशभर चर्चा सुरू आहे. त्यांच्याकडे ‘आदर्श’त्त्वाचे उदाहरण म्हणून पाहिले जात आहे. चौहान यांच्या नेतृत्वाखालील सैपर्सची टीम अनेक अभियांत्रिकी कामांसाठी जबाबदार असेल. त्यांना तीन महिन्यांच्या कालावधीसाठी सियाचीन पोस्टवर तैनात करण्यात आल्याचे भारतीय लष्कराने सांगितले. सोशल मीडियावर त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत असून सियाचीनमध्ये अत्यंत कमी तापमानात पॅप्टन चौहान सायकलिंग आणि रॉक क्लाइंबिंगसारख्या उपक्रमांमध्ये भाग घेताना दिसत आहेत. पंतप्रधान मोदींनी त्यांच्या पोस्टिंगचे यापूर्वी कौतुक केले होते. विविध आव्हानांना न जुमानता पॅप्टन शिवा हिने पूर्ण बांधिलकीने प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केले आणि आता ती सियाचीन ग्लेशियरमध्ये सामील होण्यासाठी तयार असल्याचे पंतप्रधान म्हणाले.
कौटुंबिक पार्श्वभूमी
कॅप्टन शिवा चौहान ह्या राजस्थानच्या रहिवासी असून त्या बंगाल सॅपर्सच्या अधिकारी आहेत. वयाच्या 11 व्या वषी त्यांनी वडिलांचे छत्र गमावले होते. तरीही गृहिणी असलेल्या आईने तिला घडवण्याची योग्य काळजी घेतली होती. कॅप्टन शिवा यांचे शालेय शिक्षण उदयपूरमधून झाले. त्यांनी उदयपूरच्या एनजेआर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये पदवी प्राप्त केली आहे. लहानपणापासूनच चौहान यांना भारतीय सशस्त्र दलात सामील होण्यासाठी प्रेरणा मिळाली. चेन्नईतील ऑफिसर्स टेनिंग अकादमी येथे प्रशिक्षणादरम्यान त्यांनी अतुलनीय उत्साह दाखवल्यानंतर मे 2021 मध्ये त्यांना अभियंता रेजिमेंटमध्ये नियुक्त करण्यात आल्याची माहिती लष्कराकडून देण्यात आली.
सियाचीन बॅटल स्कूलमधून प्रशिक्षण
जुलै 2022 मध्ये कारगिल विजय दिवसानिमित्त आयोजित सियाचीन युद्ध स्मारक ते कारगिल युद्ध स्मारकापर्यंत 508 किलोमीटरचे अंतर कापत कॅप्टन शिवा चौहान यांनी सायकल मोहिमेचे यशस्वी नेतृत्व केले. नेत्रदीपक कामगिरीमुळे त्यांची सियाचीन बॅटल स्कूलमध्ये प्रशिक्षण घेण्यासाठी निवड झाली होती. कॅप्टन शिवा चौहान यांना कुमार पोस्टमध्ये ऑपरेशन स्वऊपात तैनात करण्यात आल्याचे फायर अँड फ्यूरी कॉर्प्सकडून सांगण्यात आले. कुमार पोस्टमध्ये तैनात करण्यापूर्वी शिवा चौहान यांना अवघड प्रशिक्षणाला सामोरे जावे लागले होते.
…15,632 फूट उंचीवर तैनात सियाचीन ग्लेशियर ही पृथ्वीवरील सर्वात उंचीवरील युद्धभूमी आहे. यापूर्वी सप्टेंबर 2021 मध्ये सियाचीन ग्लेशियरवर 15,632 फुटांच्या उंचीवरील कुमार पोस्टवर 8 दिव्यांगांची एक टीम पोहोचली होती. त्यांनी कुमार पोस्टवर पोहोचून विश्वविक्रम केला होता. सियाचीन ग्लेशियरमधील कुमार पोस्ट 15,632 फूटांच्या उंचीवर आहे. फायर अँड फ्यूरी कॉर्प्सकडून त्यांच्या प्रशिक्षणादरम्यानची छायाचित्रे शेअर करण्यात आली आहेत. ही छायाचित्रे आता सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत









