ऑनलाईन टीम /तरुण भारत
कॅप्टन अमरिंदर सिंग (Amarinder Singh Former Chief minister of Punjab) यांनी पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू (navjot singh sidhu) यानेही आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने एकच खळबळ उडाली. बुधवारी कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी केंद्रीय मंत्री अमित शाह (Union Home Minister Amit Shah) यांची भेट घेतली. या भेटीनंतर कॅप्टन अमरिंदर सिंग हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. यासर्व घडामोडींमुळे राज्यात मोठा राजकीय कलह पाहायला मिळाला. पंजाब काँग्रेसमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाल्याची परिस्थिती असतानाच खुद्द कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या पत्नीने अर्थात काँग्रेस खासदार परनीत कौर यांनी मात्र काँग्रेस सोडण्यास नकार दिला आहे. “मी काँग्रेस सोडणार नाही”, अशी स्पष्ट भूमिका परनीत कौर (Preneet Kaur Member of the Lok Sabha) यांनी घेतली आहे. त्यामुळे या सगळ्या गोंधळात कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्याप्रमाणेच त्याही काँग्रेसला रामराम करण्याच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.
कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या पत्नी परनीत कौर या देखील त्यांच्याच पावलावर पाऊल ठेऊन राजीनामा देतील, असं म्हटलं जात होतं. मात्र, त्यावर खुद्द परनीत कौर यांनीच पडदा टाकला आहे. त्यांनी “मी काँग्रेस (Congress) पक्षासोबतच राहणार आहे. मी काँग्रेसची खासदार असून त्या पदावर देखील मी कायम राहणार आहे. सध्या तरी काँग्रेस पक्ष सोडण्याचा माझा कोणताही विचार नाही”, असं परनीत कौर म्हणाल्या आहेत. दरम्यान, आपल्या भविष्यातील योजनांविषयी बोलणं त्यांनी टाळलं. “मी माझ्या भविष्यातील योजनांविषयी काही बोलणार नाही. पण सध्या तरी पंजाब काँग्रेसमध्ये जे काही घडतंय, त्यामुळे प्रत्येक कार्यकर्ता दु:खी आहे”, असं त्या म्हणाल्या.