नवी दिल्ली/प्रतिनिधी
पंजाब मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर नाराज असणारे कॅप्टन अमरिंदर सिंग (Amarinder Singh Former Chief minister of Punjab) यांनी बुधवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah Union Home Minister) यांची भेट घेतली. त्यानंतर आता पुढच्या पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी ते भाजपामध्ये जाणार अशा चर्चा सुरू आहेत. तर काल काँग्रेसच्या जी-२३ नेत्यांपैकी एक असलेल्या कपिल सिब्बल (Kapil Sibal Member of Rajya Sabha) यांनी काँग्रेसच्या नेतृत्वाविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केलाय. “काँग्रेसमध्ये निवडून आलेला अध्यक्ष नाही. निर्णय कोण घेत आहे? हे आम्हाला माहिती ना्ही.”, असं वक्तव्य सिब्बल यांनी केलं होतं. या विधानासह त्यांनी काँग्रेस वर्किंग कमिटीची बैठक बोलवण्याची मागणी देखील त्यांनी केली होती. सिब्बल यांच्या या वक्तव्यामुळे काँग्रेसमधील अंतर्गत धुसपूस पुन्हा सर्वांसमोर येत असून काँग्रेसमध्ये दोन गट असल्याचे दिसत आहे. यातच नाराज असलेले माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग हे जी-२३ नेत्यांची भेट घेणार आहेत.
कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसने मुख्यमंत्रिपदासाठी दलित उमेदवार चरणजीत सिंग चन्नी (Charanjit Singh Channi Chief minister of Punjab) यांची निवड केली. त्यानंतर काही दिवसांतच नवज्योतसिंग सिद्धू यांनी पंजाब काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. तर कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. तर आज ते काँग्रेसच्या जी-२३ नेत्यांची भेट घेणार आहेत. या भेटीनंतर कॅप्टन अमरिंदर सिंग काय निर्णय घेणार याकडे सर्वांच्या नजरा असणार आहेत.