नीलम कुमार यांनी आजवर दहा पुस्तकं लिहिली आहेत. या पुस्तकांमधून त्यांनी स्वतःच्या आयुष्याची कथा तर मांडली आहेच शिवाय इतरांच्या आयुष्यातली सकारात्मकताही लोकांपुढे आणली आहे. नीलम कुमार यांचे आई-वडील सरकारी अधिकारी होते. त्यांना कामानिमित्ताने काही काळ रशियाला रहावं लागलं. यामुळे नीलम कुमार यांचं बालपण मॉस्कोमध्ये गेलं. नीलम यांच्या दृष्टीने हा अतिशय रम्य काळ होता. रशियातलं शिक्षण फक्त पुस्तकी ज्ञानापुरतं मर्यादित नव्हतं. मुळात अभ्यासासाठी पुस्तकंच नव्हती. मुलं निसर्गाच्या सानिध्यात, तणावमुक्त वातावरणात शिकत असत. नीलम आणि त्यांच्या बहिणीलाही अशा पद्धतीचं शिक्षण घेण्याची संधी मिळाली. काही काळानंतर हे कुटुंब भारतात आलं. नीलम यांनी इंग्रजी साहित्यात पदवी मिळवली. त्यांना पत्रकारितेचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी अमेरिकेतल्या रोटरी फाउंडेशनची शिष्यवृत्तीही मिळाली. दरम्यानच्या काळात त्यांचं मासिकं तसंच वृत्तपत्रांमधलं लिखाण सुरू होतं.
नीलम यांनी अमेरिकेला जाऊन पत्रकारितेत मास्टर्स पदवी मिळवली. शोधपत्रकारितेचं शिक्षण घेतलं. तसंच काही वृत्तपत्रांमध्ये शिकाऊ पत्रकार म्हणून कामही केलं. वयाच्या एकोणीसाव्या वर्षी त्यांची विश्वमणी कुमार यांच्याशी ओळख झाली. ओळखीचं रुपांतर प्रेमात झालं आणि त्यांनी लग्नही केलं. नीलम दोन मुलांच्या आईसुद्धा झाल्या. काही काळानंतर नीलम कुटुंबासोबत भारतात परतल्या. कुटुंबाच्या जबाबदारीमुळे त्यांनी शोधपत्रकारिता न करण्याचा निर्णय घेतला. मात्र वृत्तपत्रांमधलं लिखाण सुरू ठेवलं. त्यांनी दोन पुस्तकंही लिहिली. सर्व काही सुरळीत सुरू असताना नीलम यांच्यावर नियतीने घाला घातला. त्यांच्या पतीचं हृदयविकाराच्या झटक्याने अकस्मात निधन झालं. नीलम यांच्यासाठी हा मोठा धक्का होता. दोन लहान मुलांची जबाबदारी नीलम यांच्या खांद्यांवर येऊन पडली होती. पती निधनाच्या दुःखातून बाहेर पडत नाहीत तोच त्यांना स्तनांच्या कॅन्सरचं निदान झालं. दरम्यानच्या काळात त्यांना बर्याच आव्हानांना सामोरं जावं लागलं. लोकांच्या प्रश्नार्थक नजरा झेलाव्या लागल्या. नीलम यांच्या धाकटय़ा मुलाने त्यांना उपचारांसाठी मुंबईला आणलं. नीलम हतबल झाल्या. आपणच का, असा प्रश्न त्यांना पडू लागला. मात्र नंतर त्यांनी स्वतःला सावरलं. त्या कॅन्सरमधूनही बाहेर पडू लागल्या होत्या. त्यांनी लिखाण सुरूच ठेवलं होतं. त्यांना खुशवंत सिंग यांच्यासोबत एका पुस्तकावर काम करण्याचा प्रस्ताव मिळाला. नीलम यांच्यासाठी ही सुवर्णसंधी होती. या दोघांनी लिहिलेलं ‘अवर फेवरिट इंडियन स्टोरीज’ हे पुस्तक 2002 मध्ये प्रकाशित झालं आणि तुफान गाजलं. नीलम कुमार यांना मार्ग मिळाला होता. 2017 मध्ये नीलम यांच्या कॅन्सरने पुन्हा डोकं वर काढलं. पण यावेळी त्या खंबीर होत्या. नीलम यांच्या कॅन्सरवर काहीतरी लिहायचं होतं. त्यांनी या विषयावरील पुस्तकं वाचली. मात्र या पुस्तकांचा शेवट दुःखी होता. ‘आनंद’सारख्या चित्रपटातही नायकाचा मृत्यू झाल्याचं दाखवण्यात आलं होतं. पण कॅन्सर म्हणजे दुःख नाही हे त्यांना लोकांपर्यंत पोहचवायचं होतं. त्यांनी ‘माय जर्नी ऑफ जॉय’ हे पुस्तक लिहिलं. ‘हिल्ड : हाऊ कॅन्सर गेव्ह मी अ न्यू लाईफ’ हे मनिषा कोईरालाचं चरित्रही त्यांनी शब्दबद्ध केलं. नीलम यांनी दहा पुस्तकं लिहिली असून ती खूप लोकप्रिय झाली आहेत. नीलम लाईफ कोचही आहेत. अनेकांच्या अंधःकारमाय आयुष्याला आकार देण्याचं काम त्या करत आहेत. आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी खचून जायचं नाही याचे धडेच नीलम यांनी घालून दिले आहेत.









