‘तरुण भारत’ इफेक्ट : हर्षदा तांडेल यांच्या उपचारासाठी 70 हजारांची मदत
वार्ताहर / मालवण:
येथील सरस्वती टॉकीजसमोरील हर्षदा प्रमोद तांडेल या कॅन्सरग्रस्त तरुणीवर वैद्यकीय उपचारासाठी मालवण शहरातील दानशूर व्यक्तींनी पुढाकार घेतला आहे. हर्षदा यांना शहरातील दानशूर व्यक्तींनी व सेवाभावी संघटनांनी 70 हजार रुपयांची आर्थिक मदत केली आहे. हर्षदा तांडेल व त्यांच्या कुटुंबियांनी मदतीबद्दल दानशूर व्यक्ती, सामाजिक संघटना व ‘तरुण भारत’चे आभार मानले आहेत.
2 मार्च 2021 रोजीच्या ‘तरुण भारत’मध्ये ‘कॅन्सरग्रस्त मुलीसाठी चालत गाठले कुडाळ’ या मथळय़ाखाली हर्षदा यांच्याविषयीचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. या वृत्तानंतर शहरातील सेवाभावी संघटना व दानशूर व्यक्तींनी हर्षदाची भेट घेऊन त्यांना वैद्यकीय उपचारासाठी आर्थिक मदत केली आहे.
सेवाभावी संस्था व दानशूर व्यक्तींकडून मदत
हर्षदा तांडेल यांचे कणकवली येथे डॉ. नागवेकर यांच्याकडे कॅन्सरचे ऑपरेशन झाले होते. त्यांच्या वडिलांनी दागिने गहाण ठेवून ऑपरेशन केले. परंतु हर्षदा यांच्या पुढील उपचारासाठी पैसे नसल्याने त्यांच्यावरील उपचार थांबले होते. मातृत्व आधार फाऊंडेशनने त्यांच्या उपचारासाठी 11 हजार रुपयांची आर्थिक मदत केली. 100 इडियट्स ग्रुपच्या माध्यमातून 30 हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली. तसेच शुभांगी सुकी यांनी 6 हजार, रुजारिओ पिंटो यांनी 10 हजाराची आर्थिक मदत केली. मातृत्व आधार फाऊंडेशनने हर्षदा यांच्या उपचारासाठी प्रत्येकी 100 रुपयांच्या मदतीचे आवाहन केले होते. त्या आवाहनाला प्रतिसाद मिळाला असून लवकरच ही मदत हर्षदा यांच्याकडे सुपूर्द केली जाईल, असे फाऊंडेशनचे दादा वेंगुर्लेकर यांनी सांगितले आहे.
वाढदिवसाच्या खर्चाची रक्कम उपचारासाठी
नगराध्यक्ष महेश कांदळगावकर व सौ. स्मृती कांदळगावकर यांनी लग्नाच्या 25 व्या वाढदिवसानिमित्त हर्षदा यांची भेट घेऊन वाढदिवसावर खर्च होणारे 10 हजार रुपये त्यांच्या पुढील उपचारासाठी मातृत्व आधार फाऊंडेशनतर्फे त्यांच्याकडे सुपूर्द केले. मातृत्व आधार फाऊंडेशनचे कार्यकर्ते आणि पर्यटन व्यावसायिक जगदिश तोडणकर यांची मुलगी दिव्या तोडणकर यांनी वाढदिवसाच्या खर्चाची 3 हजार रुपये रक्कम हर्षदा यांच्या वैद्यकीय उपचारासाठी दिली.
राजा शंकरदास यांचा असाही आदर्श
मातृत्व फाऊंडेशनचे राजा शंकरदास यांनी हर्षदा तांडेल यांना उपचारासाठी डॉक्टरांकडे नेण्यासाठी स्वत:ची गाडी दिली. स्वत: डॉक्टरांची फीही भरली. हर्षदा यांच्यावर डॉक्टरांनी उपचार केल्यानंतर त्यांना गाडीने पुन्हा मालवणला आणून सोडले.









