पुणे येथील संस्थेशी 20 वर्षांचा करार : मोठा आर्थिक व्यवहार झाल्याची चर्चा, चौकशी करण्याची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
शाळा सुरू करण्याच्या मंजुरीसाठी मैदान असणे बंधनकारक आहे. कॅन्टोन्मेंटच्यावतीने तीन माध्यमाच्या शाळा चालविण्यात येतात. 1200 हून अधिक विद्यार्थी शाळेत शिकत आहेत. मात्र कॅन्टोन्मेंट बोर्डने शाळेचे मैदान भाडेतत्त्वावर देण्याचा प्रयत्न चालविला आहे. तसेच हे मैदान मोफतरित्या भाडेतत्त्वावर दिले असल्याने या मागचे गौडबंगाल काय, असा मुद्दा उपस्थित झाला आहे.
कॅन्टोन्मेंट कार्यक्षेत्रातील गरजू आणि गरिबांसाठी मोफत शिक्षण देण्याची सुविधा कॅन्टोन्मेंट बोर्डने उपलब्ध केली आहे. शंभर वर्षे ओलांडलेल्या शाळेचे भव्य मैदान भाडेतत्त्वावर देण्याचा प्रकार कॅन्टोन्मेंट बोर्डने केला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. कॅन्टोन्मेंट मुख्य कार्यालय आवारात उर्दू, मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळा चालविण्यात येतात. 1200 हून अधिक विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेत आहेत. तसेच विविध क्रीडा स्पर्धांमध्ये, वैज्ञानिक प्रदर्शनाच्या स्पर्धांमध्ये येथील विद्यार्थ्यांनी पारितोषिके मिळविली आहेत. कॅन्टोन्मेंट व्यतिरिक्त महापालिका व्याप्तीमधील गरजू विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेतात. या तिन्ही शाळेतील विद्यार्थ्यांना पुरेल असे भव्य मैदान आहे. मात्र कोरोना कालावधीत शाळा बंद ठेवण्यात आल्याने शाळेच्या मैदानात गवत, झाडे झुडपे उगवल्याने दुरवस्था झाली होती. पण याच दरम्यान कॅन्टोन्मेंट बोर्डने शाळेचे मैदान भाडेतत्त्वावर देण्याचा करार केला असल्याची बाब निदर्शनास आली आहे. शाळेचे मैदान भाडे तत्त्वावर देण्यामागचा उद्देश काय, अशी विचारणा कॅन्टोन्मेंटच्या अधिकाऱयांकडे कॅन्टोन्मेंट परिसरातील पालकांनी केली असता व्यवस्थित माहिती देण्यास टाळाटाळ चालविली आहे.
माहिती देण्यास चालढकल
कोणत्या आधारावर आणि कोणत्या करारानुसार शाळेचे मैदान खासगी संघटनेला भाडेतत्त्वावर दिले याची माहिती देण्यास अधिकाऱयांनी चालढकल चालविली आहे. शाळेतील विद्यार्थ्यांना मैदानाची आवश्यकता असताना भाडेतत्त्वावर देण्याचे प्रयोजन काय असा मुद्दा उपस्थित झाला आहे. क्रिकेट, हॉकी, फुटबॉल, कबड्डी असे सर्वच खेळ शाळेतील विद्यार्थी खेळत असतात. त्याकरिता संपूर्ण मैदान गरजेचे आहे. असे असताना निम्या मैदानात बॅडमिंटन कोर्ट बनविण्यात आले आहे. शाळेच्या वेळेत विद्यार्थ्यांसाठी मैदान उपलब्ध केले जाईल मात्र त्यानंतर विविध क्रिडा स्पर्धांच्या प्रशिक्षणासाठी खासगी तत्त्वावर बाहेरच्या क्रीडापटूंना मैदान उपलब्ध केले जाणार आहे. रात्री 11 पर्यंत प्रशिक्षण देण्याची मुभा एमओयूमध्ये करण्यात आल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
माहिती लपविण्याचा प्रकार
मैदान 20 वर्षांच्या कराराने कोणताही महसूल न घेता भाडेतत्त्वावर देण्यात आल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. मात्र ही माहिती लपविण्याचा प्रकार कॅन्टोन्मेंट बोर्डच्या अधिकाऱयांनी चालविला असून मोठा आर्थिक व्यवहार झाल्याची चर्चाही ऐकावयास मिळत आहे. सदर मैदान शाळेसाठी आवश्यक असताना 20 वर्षांच्या कराराने भाडेतत्त्वावर देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे स्वच्छता कामगारांच्या क्वॉर्टर्सजवळील खुली जागादेखील पुणे स्थित क्रीडा संस्थेला भाडे तत्त्वावर देण्यात आल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. विना मोबदला जागा भाडेतत्त्वावर देण्याचा प्रकार म्हणजे मोठा गैरकारभार असल्याची टीका होत असून, याची चौकशी करावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.