20 हजार लोकसंख्या असलेल्या भागाकडे जिल्हा प्रशासनासह राज्य शासनाचेही दुर्लक्ष
प्रतिनिधी / बेळगाव
शहरात 24 तास पाणीपुरवठा योजना राबविण्यासाठी हालचाली सुरू आहेत. दुसरीकडे कॅन्टोन्मेंटवासियांच्या पाणीपट्टीत वाढ करण्यात आली आहे. पण त्यांना 24 तास पाणीपुरवठा करण्याच्यादृष्टीने कोणताच प्रस्ताव तयार करण्यात आला नाही. त्यामुळे कॅन्टोन्मेंट वगळून शहरात 24 तास पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत आहे.
महापालिकेच्यावतीने शहरातील 10 वॉर्डांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर 24 तास पाणीपुरवठा योजना राबविण्यात आली होती. ही योजना यशस्वी ठरली असून पाण्याची बचत होत आहे. तसेच 10 वॉर्डांमधील रहिवाशांना 24 तास पाणी मिळत आहे. त्यामुळे या योजनेचा विस्तार करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. महानगरपालिकेच्या उर्वरित 48 वॉर्डांमध्ये 24 तास पाणीपुरवठा करण्यासाठी प्रस्ताव तयार करून अंमलबजावणीस प्रारंभ झाला आहे. राकसकोप जलाशय आणि हिडकल जलाशयामधून शहराला पाणीपुरवठा केला जातो. मात्र, शहराची वाढती व्याप्ती आणि वाढती लोकसंख्या पाहता पाण्याची मागणी वाढत आहे. त्यामुळे पाणी बचतीबरोबर मुबलक पाणी उपलब्ध करून देण्यासाठी 24 तास पाणीपुरवठा योजना राबविण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. शहराची लोकसंख्या 6 लाख असून त्यांना दररोज पाणीपुरवठा करण्याच्यादृष्टीने महत्त्वाकांक्षी योजना राबविण्यात येत आहे. त्यामुळे ही योजना बेळगावकरांसाठी लाभदायक ठरणार आहे.
हिडकल आणि राकसकोप जलाशयांतील पाणीपुरवठा कॅन्टोन्मेंट, एमईएस आणि एअरफोर्सलादेखील केला जातो. मात्र, या ठिकाणी 24 तास पाणीपुरवठा करण्याच्यादृष्टीने कोणताच प्रस्ताव तयार करण्यात आला नाही. 24 तास पाणीपुरवठा योजनेच्या आराखडय़ात कॅन्टोन्मेंट परिसराचा समावेश करण्यात आला नाही. त्यामुळे कॅन्टोन्मेंट वगळता संपूर्ण शहरात 24 तास पाणीपुरवठा योजना राबविण्यात येणार आहे. कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत 1250 घरे असून कॅन्टोन्मेंटकडून पाणीपुरवठा केला जातो. मात्र, पाणीपुरवठय़ासाठी कॅन्टोन्मेंटकडे पाण्याचे स्रोत नाहीत. त्यामुळे महापालिकेकडून पाणी विकत घेऊन कॅन्टोन्मेंटवासियांना पुरवठा करण्यात येतो. मात्र, पाण्याचे बिल आणि
त्यांच्याकडून मिळणारी पाणीपट्टी यामध्ये मोठी तफावत असल्याने पाण्याचे बिल थकले आहे. कॅन्टोन्मेंट परिसरात तीन दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो. येथील लोकसंख्या 20 हजारच्या आत आहे. त्यामुळे 24 तास पाणीपुरवठा योजनेमध्ये कॅन्टोन्मेंट विभागाचा समावेश करणे आवश्यक होते. मात्र, कॅन्टोन्मेंट वगळून 24 तास पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत आहे.
जिल्हा प्रशासन, महापालिका-कॅन्टोन्मेंट बोर्डने विचार करण्याची गरज
कॅन्टोन्मेंट बोर्ड शहराचा अविभाज्य भाग असल्याने या भागाचा समावेशदेखील 24 तास पाणीपुरवठा योजनेत करण्याची गरज आहे. केवळ 20 हजार लोकसंख्या असलेल्या या भागाकडे जिल्हा प्रशासनासह राज्य शासनानेदेखील दुर्लक्ष केले आहे. वास्तविक पाहता मराठा लाईट इन्फंट्री सेंटर हे देशाची शान आहे. येथे प्रशिक्षण घेणाऱया जवानांसह देशसेवा बजावणाऱया मराठा लाईट इन्फंट्रीच्या जवानांना 24 तास पाणीपुरवठा सुविधा उपलब्ध करणे आवश्यक आहे. त्यामुळे 24 तास पाणीपुरवठा योजनेत कॅन्टोन्मेंटचा समावेश करण्याच्यादृष्टीने जिल्हा प्रशासन, महापालिका आणि कॅन्टोन्मेंट बोर्डने विचार करण्याची गरज आहे.









