निवडणुकीच्या दृष्टीने संरक्षण खात्याची तयारी : 30 एप्रिल रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्याची सूचना
प्रतिनिधी / बेळगाव
कॅन्टोन्मेंट बोर्ड लोकनियुक्त सभागृह बरखास्त झाल्यानंतर निवडणूक घेण्याच्या दृष्टीने संरक्षण खात्याने तयारी चालविली आहे. दि. 30 एप्रिल रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्याची सूचना करण्यात आली आहे. त्यामुळे तात्कालिक मतदार यादी प्रसिद्ध करून दि. 3 एप्रिल रोजी दुपारी 4 वाजेपर्यंत मतदार यादीबाबत तसेच विविध दुरुस्तींसाठी तक्रार करण्याचे आवाहन कॅन्टोन्मेंट बोर्डने केले आहे.
कॅन्टोन्मेंट बोर्डच्या लोकनियुक्त सभागृहाची मुदत दि. 10 फेब्रुवारी रोजी संपली आहे. त्यामुळे दि. 11 फेब्रुवारीपासून प्रशासकीय राजवट लागू करण्यात आली आहे. तसेच निवडणूक घेण्याच्या दृष्टीने संरक्षण खात्याने हालचाली चालविल्या आहेत. कॅन्टोन्मेंट बोर्डला नोटीस बजावून दि. 30 एप्रिल रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्याची सूचना संरक्षण खात्याने केली आहे. त्यापूर्वी मतदार यादीत नवीन नावे दाखल करणे तसेच मयत व्यक्तीचे नाव कमी करणे, चुकीचे नाव दुरुस्त करणे, अशी प्रक्रिया पूर्ण करण्याचा आदेश संरक्षण खात्याने बजावला आहे. त्यामुळे कॅन्टोन्मेंट बोर्डने मतदार यादी तयार करण्यासाठी आवश्यक कार्यवाहीस प्रारंभ केला आहे. यापूर्वी कॅन्टोन्मेंट बोर्डने मतदार यादी तयार करून हरकती मागविल्या होत्या. पण कोरोना विषाणूच्या प्रसारामुळे हरकती मागविण्याची प्रक्रिया थांबविण्यात आली होती. मात्र आता त्यावेळी तयार करण्यात आलेली तात्कालिक मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली असून याबाबत आक्षेप आणि सूचना नोंद करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कॅन्टोन्मेंट कार्यालयात सकाळी 11 ते दुपारी 4 यावेळेत दि. 3 एप्रिलपर्यंत हरकती नोंदविण्याची सूचना करण्यात आली आहे. चुकीच्या नावाची दुरुस्ती, नाव दाखल करणे किंवा कमी करणे, आदी सर्व तक्रारांबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नावे अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कोणत्याही प्रकारचा दावा करावयाचा असल्यास कॅन्टोन्मेंट कार्यकारी अधिकारी यांच्या नावे अर्ज करावेत. जर पोस्टामार्फत हरकती किंवा सूचना करावयाच्या असल्यास नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून 20 दिवसांच्या आत हरकती दाखल होणे बंधनकारक आहे. हरकती किंवा सूचनांचे अर्ज व्यवस्थित नसल्यास आणि वेळेत न पोहोचल्यास त्या नामंजूर करण्यात येतील. दि. 5 आणि 6 एप्रिल रोजी कॅन्टोन्मेंट बोर्ड अध्यक्ष किंवा त्यांनी नियुक्त केलेल्या अधिकाऱयांकरवी हरकतीवर सुनावणी होईल. त्यामुळे नागरिकांना मतदार यादीबाबत कोणतीही तक्रार असल्यास दि. 3 एप्रिलपूर्वी अर्ज करण्याचे आवाहन केले आहे.









