केंद्र-राज्य शासन तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून कॅन्टोन्मेंटला निधी देण्याचा निर्णय
प्रतिनिधी /बेळगाव
कॅन्टोन्मेंट परिसरातील विकासकामे करण्यासाठी व्हेईकल एन्ट्री फी आकारण्याची तरतूद कॅन्टोन्मेंट कायद्यात आहे. या कायद्यानुसार देशातील विविध कॅन्टोन्मेंटकडून व्हेईकल एन्ट्री फीची वसुली केली जाते. मात्र, व्हेईकल एन्ट्री फी वसूल करू नये, असा आदेश आता संरक्षण खात्यानेच बजावला आहे. त्यामुळे फी वसूल करणाऱया कॅन्टोन्मेंटना आर्थिक फटका बसला आहे.
कॅन्टोन्मेंट परिसरातील रस्त्यांचा विकास, देखभाल तसेच कॅन्टोन्मेंट बोर्डचा कारभार चालविण्यासाठी निधीची आवश्यकता आहे. यापूर्वी हा निधी विविध माध्यमातून वसूल करण्यात येत होता. तसेच कॅन्टोन्मेंट परिसरातील रस्त्यांवरून फिरणाऱया प्रत्येक व्यावसायिक वाहनांकडून एन्ट्री फी वसूल करण्याची तरतूद कायद्यात आहे. यानुसार प्रत्येक कॅन्टोन्मेंटला व्हेईकल एन्ट्री फी वसूल करण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे. देशातील 63 कॅन्टोन्मेंटपैकी काही कॅन्टोन्मेंट बोर्ड शहरालगत येत असल्याने प्रत्येक वाहनाला कॅन्टोन्मेंटच्या हद्दीतील रस्त्यांवरून ये-जा करावी लागते. त्यामुळे वाहनधारकांना आर्थिक भुर्दंड बसत होता. व्यावसायिक वाहने चालविण्यासाठी परिवहन मंडळाकडे रोड टॅक्स भरला जातो. तरीदेखील कॅन्टोन्मेंटकडून एन्ट्री फी वसूल करण्यात येत असल्याने काही ठिकाणी विरोध झाला होता. केंद्र आणि राज्य शासनाकडून अनुदान देण्यात येत असल्याने काही कॅन्टोन्मेंटनी एन्ट्री फी वसूल करण्याचे थांबविले होते. मात्र, बहुतांश कॅन्टोन्मेंटकडे उत्पन्नाचे साधन नसल्याने ही फी वसूल करण्यात येते. पण ही फी वसूल करण्यास संरक्षण खात्याने ब्रेक लावला आहे.
संरक्षण खात्याकडून सक्त सूचना
आजही काही कॅन्टोन्मेंटकडून हद्दीवर बॅरिकेड्स लावून नाक्मयांची उभारणी करून एन्ट्री टॅक्स वसूल करण्यात येत असल्याचे संरक्षण खात्याच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे वाहतुकीस अडथळा होत आहे. तसेच मालवाहतूक करताना अडचणी निर्माण होत आहेत. जीवनोपयोगी साहित्याची वाहतूक करणे आवश्यक आहे. त्यामुळे जीवनोपयोगी साहित्याची वाहतूक करताना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये त्यादृष्टीने व्हेईकल एन्ट्री टॅक्स वसूल करण्याचे स्थगित करण्याचा आदेश बजावण्यात आला आहे. तसेच या बदल्यात केंद्र आणि राज्य शासनाकडून तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून कॅन्टोन्मेंट बोर्डला निधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे ही फी वसूल करू नये, अशी सूचना करण्यात आली आहे. यापुढे कोणत्याही कॅन्टोन्मेंट बोर्डने व्हेईकल एन्ट्री फी वसूल करू नये, अशी सक्त सूचना संरक्षण खात्याने बजावली आहे.
वसुलीस केंद्र शासनाकडून ब्रेक
बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डने 2011 च्या दरम्यान व्हेईकल एन्ट्री फी वसूल करण्यासाठी विविध ठिकाणी नाक्मयांची उभारणी केली होती. तसेच ही फी वसूल करण्याची मोहीमदेखील हाती घेतली होती. मात्र, स्थानिक नागरिकांनी तसेच वाहनधारकांनी जोरदार विरोध दर्शविला. महापालिका हद्दीतून शहराबाहेर जाण्यासाठी कॅन्टोन्मेंटच्या रस्त्यांवरूनच ये-जा करावी लागते. त्यामुळे वाहनधारकांना आर्थिक भुर्दंड भरावा लागल्याने एन्ट्री फी वसूल करण्यास आक्षेप घेऊन आंदोलन छेडले होते. त्यामुळे व्हेईकल एन्ट्री फी वसूल करण्याचे थांबविण्यात आले होते. मात्र, विविध ठिकाणी हद्दीवर चौक्मया आजही पडून आहेत. पण यापुढे व्हेईकल फी एन्ट्री वसुलीस केंद्र शासनानेच ब्रेक लावला आहे.









