प्रतिनिधी / बेळगाव
कोरोना विषाणूचा प्रसार झाल्याने कॅन्टोन्मेंटमधील नागरिकांसह अधिकारी-कर्मचाऱयांना कोरोनाची लागण झाली. तिसऱया लाटेत कोणतीही जीवितहानी झाल्यास याचा फटका कॅन्टोन्मेंट कर्मचाऱयांच्या कुटुंबीयांना बसू शकतो. त्यामुळे कॅन्टोन्मेंटच्या कर्मचाऱयांना विमा कवच देण्याचा निर्णय संरक्षण खात्याने घेतला आहे. याकरिता निधीची तरतूद करण्याची सूचना कॅन्टोन्मेंट बोर्डला करण्यात आली आहे.
कॅन्टोन्मेंट बोर्डची मासिक बैठक शुक्रवार दि. 25 रोजी सकाळी 11 वाजता होणार असून यावेळी विमा कवच देण्यासाठी निधीच्या तरतुदीबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. कोरोना बाधितांना काम करावे लागत असल्याने कॅन्टोन्मेंटच्या कर्मचाऱयांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डच्या रुग्णालयात तसेच स्वच्छता विभागात वयोवृद्ध नागरिक कार्यरत आहेत. कोरोनाची बाधा झाल्यास कुटुंबीयांचे नुकसान होण्याची शक्मयता आहे. त्यामुळे या क्षेत्रात काम करणाऱया कर्मचाऱयांसाठी विमा कवच देण्याची सूचना पुणे सदर्न कमांडने कॅन्टोन्मेंट बोर्डला केली आहे. कोरोनामुळे कर्मचाऱयाचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसदारांना आधार देण्यासाठी आर्थिक मदतीची गरज आहे. त्यामुळे कॅन्टोन्मेंटच्या कोरोना योद्धय़ांसाठी ग्रुप इन्शुरन्स योजना राबविण्याची सूचना केली आहे. याकरिता आवश्यक असलेल्या निधीची तरतूद कॅन्टोन्मेंट बोर्डला करावी लागणार आहे. याबाबत बोर्डच्या बैठकीत निर्णय घेण्यात येणार आहे. कॅन्टोन्मेंट हद्दीतील विविध उद्यानांचा विकास करण्यात येत आहे. रस्त्याशेजारी सुशोभीकरण करण्याची कामे करण्यात येत आहेत. पण कोरोनाचा प्रसार झाल्याने लॉकडाऊन करण्यात आले होते. त्यामुळे कामगारांअभावी विकासकामे ठप्प झाली होती. सदर विकासकामे पूर्ण करण्यासाठी वाढीव मुदत देण्याबाबतही बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे. कॅन्टोन्मेंटच्यावतीने उच्च न्यायालयात न्यायालयीन कामकाज पाहण्यासाठी वकील नियुक्त करण्यात येणार असून याबाबतही चर्चा करून निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.









