प्रतिनिधी / बेळगाव
पॅन्टोन्मेंट परिसरातील समस्यांचे निवारण करण्यासाठी निधी नसल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, विविध विकासकामे राबविण्याचा सपाटा कॅन्टोन्मेंट बोर्डने चालविला आहे. मुख्य कार्यालयाच्या दुरुस्तीचे कामही सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे कॅन्टोन्मेंटकडे खरोखरच निधी उपलब्ध नाही का? असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे.
कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील रहिवाशांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. स्वच्छता आणि पथदीप सुविधा, रस्त्यांची समस्या आदी नागरी सुविधा पुरविण्याची गरज आहे. मात्र, कॅन्टोन्मेंट बोर्डकडे निधी उपलब्ध नसल्याचे सांगून नागरी सुविधा पुरविण्याकडे कानाडोळा करण्यात येत आहे. परिणामी कॅन्टोन्मेंटवासियांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
एकीकडे निधी उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येत आहे तर दुसरीकडे सुशोभिकरणावर मोठय़ा प्रमाणात खर्च करण्यात येत आहे. विविध ठिकाणी उद्याने निर्मितीसह उद्यानांचा विकास करण्यावर भर देण्यात आला आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डच्या मुख्य कार्यालयातील छताच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. मुख्य कार्यालयात गळत्या लागून पाणी पाझरत आहे. त्यामुळे लाकडी फळय़ा काढून पत्रे बसविण्यात येत आहेत. विकासकामे राबविण्यासाठी कॅन्टोन्मेंट बोर्डकडे निधी नाही. मात्र, कार्यालयाचे सुशोभिकरण करण्यासाठी निधी कुठून आला? असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे. कॅन्टोन्मेंट परिसरातील समस्यांचे लवकर निवारण करावे, अशी मागणी होत आहे.









