कोरोना संकटात जोखीम पत्करून कर्मचारी देत आहेत सेवा : दररोज पुरवलं जातंय 180 जणांना जेवण
- जिल्हा शल्यचिकित्सक, आहार तज्ञांकडून दररोज होते तपासणी
शेखर सामंत / सिंधुदुर्ग:
कोरोनाची लागण होईल, या भीतीपोटी जिल्हा कोविड रुग्णालयात काम करण्यासाठी माणसे मिळत नसताना याच रुग्णालयात कोविड बाधित रुग्णांची उदरशांती करण्यासाठी म्हणजेच त्यांना जेवण, नाष्टय़ाची सोय करणारे कर्मचारी मात्र एकही दिवस सुट्टी न घेता रुग्णांना जी सेवा देत आहेत, त्याला तोड नाही. लगतच्या रानबांबुळी गावातील महिला जोखीम पत्करून ही सेवा देत आहेत, हे विशेष.
जिल्हा कोविड रुग्णालयात विलास सावंत यांच्या नेतृत्वाखाली कोविड रुग्णांना जेवण, नाष्टा पुरविण्याची जबाबदारी सांभाळणाऱया महिला व पुरुष कर्मचारी ही मंडळी देखील प्रचंड धोका पत्करत सेवा देत आहेत. जिल्हा कोविड रुग्णालयातील ही कॅन्टिन सेवा कोल्हापूर येथील ‘डी. एम.’ एन्टरप्रायझेस चालवते. जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा कोविड रुग्णालयात रुपांतर झाल्यानंतर या कॅन्टिनची जबाबदारी अधिकच वाढली. या कॅन्टिनमध्ये गेली सहा ते सात वर्षे कार्यरत असलेले व्यवस्थापक विलास सावंत हे कर्मचारी अशोक ठाकुर, रमेश बिरमुळे, संपदा संदीप परब, निखिता नेताजी गुरव, राखी राजन परब, सुप्रिया राणे, सृष्टी बांबुळकर व आरती देशपांडे यांच्या सहकार्याने मोठय़ा जबाबदारीने धोका पत्करत ही जबाबदारी पार पाडत आहेत. एकही दिवस सुट्टी न घेता दिवस-रात्र सेवा देत कोविड रुग्णांना जेवण-नाष्टा पुरविण्याची जबाबदारी हे सर्वजण पार पाडत आहेत.
सुरुवातीच्या काळात पुरेसे आणि चांगल्या दर्जाचे जेवण मिळत नाही, अशा तक्रारी वाढू लागल्या होत्या. त्यावर भाष्य करताना व्यवस्थापक विलास सावंत म्हणाले, खरं तर 110 रुपयात आम्ही दोनवेळचे जेवण, चहा, नाष्टा पुरवतो. आता त्यामध्ये एक अंडं किंवा फळ यासाठी थोडा रेट वाढून दिला आहे. मात्र तरी देखील आम्ही जे जेवण पुरवत होतो ते चांगल्याच प्रतीचे होते. आम्ही रुग्णांना जे जेवण आणि नाष्टा देतो, त्याची क्वालिटी ही आहार तज्ञांकडून फिक्स करण्यात आली आहे. रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेत या जेवणात मीठ, तेल आणि मसाल्याची मात्रा जाणीवपूर्वक कमी ठेण्यात आलेली असते. त्यामुळे काहींना हे जेवण निकृष्ट वाटते. पण वास्तवात तसे नसते. हे जेवण रुग्णांना देण्यापूर्वी दररोज स्वत: जिल्हा शल्यचिकित्सक, आहारतज्ञ, मेट्रन आदी मंडळी ते प्रत्यक्ष चेक करतात. जेवण योग्य असल्याबाबतचा त्यांचा शेरा मिळाल्याशिवाय हे जेवण रुग्णांना दिले जात नाही. आता तर जेवणामध्ये भात, वरण, उसळ ज्यामध्ये पालेभाज्यांचाही समावेश असतो. दोन चपात्या, एक अंडे अथवा फळ दिले जाते. रुग्णाला डायबेटीस असेल, तर त्याला भातऐवजी दोन चपात्या जादा दिल्या जातात. कुणाला आणखी थोडं फार वाढीव जेवणाची गरज भासली, तरही दिले जाते. याव्यतिरिक्त सकाळी आणि सायंकाळी चहाऐवजी आयुर्वेदिक काढा दिला जातो. तसेच सकाळी आठ वाजता नाष्टा म्हणून उप्पिट किंवा पोहे, दूध किंवा मध्येच भूक लागली तर शेंगदाणा लाडूदेखील दिले जातात. दररोज किमान 180 रुग्णांची सकाळ-सायंकाळ जेवण व नाष्टय़ाची सोय आम्ही करतो. या जेवण-नाष्टय़ाचे पैसे रुग्णांकडून घेतले जात नाहीत. याचे पैसे शासन देते. या सर्व जेवणावर आहार तज्ञ लांजुळकर लक्ष ठेवून असतात, असे ते म्हणाले. हे सर्व जेवण आम्ही डिस्पोजल डिशमधून रुग्णांना देतो. दुपारी 12.30 वाजता, तर सायंकाळी 7.30 वाजल्यापासून रुग्णांना जेवण देण्याची प्रक्रिया सुरू होते, असेही त्यांनी सांगितले.
या कॅन्टिनमधील महिला कर्मचाऱयांशी संवाद साधला असता त्या म्हणाल्या, आम्ही जी ही सेवा देत आहोत, त्याचे पैसे जरी आम्हाला मिळत असले तरी एक देवकार्य म्हणून आम्ही ते जबाबदारीने पार पाडत आहोत. आम्ही देखील माणसेच आहोत. आम्हाला आमचंदेखील कुटुंब आहे. परंतु, केवळ आमचाच विचार करून घरात न बसता आम्ही सेवा देण्याची ही संधी मिळते, याकरीता धोका पत्करून आम्ही कोविड रुग्णांना ही सेवा देत आहोत.
थोडक्यात, या कोरोनाच्या महामारीत जेवढे डॉक्टर, परिचारिका, आरोग्य कर्मचारी यांचे योगदान जेवढे महत्वाचे आहे तेवढेच योगदान कोविड रुग्णांना कॅन्टिन सेवा देणाऱया या सर्व कर्मचाऱयांचेही आहे.









