ओट्टावा / वृत्तसंस्था
कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांनी नुकतीच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. या चर्चेत द्विपक्षीय धोरणांसह विविध मुद्यांवर चर्चा करण्यात आली. यावेळी ट्रुडो यांनी सध्या देशात गाजत असलेला शेतकरी आंदोलनाचा तिढा चर्चेच्या माध्यमातून सोडविण्याचा सल्लाही दिला. बुधवारी पंतप्रधानद्वयींमध्ये दूरध्वनीवरून संवाद झाला.
भारतात राबविण्यात आलेल्या लसीकरण मोहिमेसंबंधी आणि कोरोनाशी दिलेल्या यशस्वी लढय़ाबद्दल ट्रुडो यांनी मोदींचे विशेष अभिनंदन केले आहे. जागतिक अर्थव्यवस्था सावरण्यासाठी सर्वांनी एकजुटीने आणि सशक्तपणे काम करण्याची अपेक्षा मोदी यांनी व्यक्त केली. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत चांगल्याप्रकारे चर्चा झाल्याची माहिती ट्रुडो यांनीच प्रसारमाध्यमांना दिली आहे. चर्चेअंती भविष्यातही संपर्कात राहण्याचा ‘शब्द’ दोघांनीही एकमेकांना दिला.









