द्वारकेतील त्या अंतःपुरात
उर्वशी, तिलोत्तमा, मेनका यांची सर ज्यांच्या नखाला सुद्धा येणार नाही अशा अत्यंत रुपसंपन्न
अनेक स्त्रिया होत्या. त्या अंतःपुरात प्रद्युम्नाने प्रवेश केला तेव्हा तो कसा दिसत
होता? प्रद्युम्नाचें कमनीय ध्यान । अपर प्रत्यक्ष श्रीभगवान। ठाण ठकार गुण लावण्य । अवयव संपूर्ण समसाम्य। सजलजलदश्याम
सुपीन। आजानुबाहु रुचिरानन। मंदहास्य आरक्त नयन। गंडमंडित कुंडलभा।त्रिवळीमंडित शोभे
उदर । दक्षिणावर्तनाभि गंभीर। सरळ नासिका बिंबाधर।
कर्णिकारसमसाम्य।विशाळ
हृदय कंबुकंठ। कंठीरवोपम जघनतट । गुल्फ वर्तुळ जानु निघोंट। पदतळ स्पष्ट बालार्क ।कूर्पर
कळाविया मणिबंध। तळहातीं शोभती सुचिन्हे विशद । सरळ कोमळ अंगुळिवृंद। वदनीं शब्द सुधोपम
।मुकुट मस्तकीं रत्नजडित । मकरकुंडलें त्वाष्ट्रघटित । कौस्तुभासमान ललामयुक्त। पदक
शोभत हृत्कमळीं ।केयूराङ्गदें बाहुवटीं । कंबुकटकें द्वय मणगटीं । अंगुळीं मुद्रिकांचिया
दाटी । माळा कंठीं मुक्तामयी ।परिधान पीताम्बर पाटोळा । त्यावरी रत्नांची मेखळा । चरणीं
तोडर बिरुदमाळा । मूर्च्छित अबळा अवलोकें।वक्र कुंतळ गल्लदेशीं । भ्रमरभासुर भ्रमराऐसी
। पंक्ति भासे जननयनांसी । श्रीवत्रासि तद्युक्त। अंतःपुरप्रवेशसमयीं । दंपती पाहूनि
सर्व स्त्रियांहीं । कृष्ण मानूनि सलज्ज हृदयीं । ठायीं ठायीं लपालिया ।
प्रद्युम्नाचे शरीर पावसाळय़ातील मेघाप्रमाणे श्यामवर्ण होते. त्याने रेशमी पितांबर परिधान केला होता. गुडघ्यापर्यंत पोहोचणारे त्याचे हात लांब होते. नेत्र लालसर होते. सुंदर मुखमंडलावर मंद हास्य तरळत होते. त्याच्या मुखकमलावर काळे कुरळे केस भ्रमरांसारखे झेपावत होते. अशा त्याला पाहताच अंतःपुरातील त्या सगळय़ाजणी त्याला श्रीकृष्ण समजून संकोचाने इकडे तिकडे लपून राहिल्या. नंतर हळूहळू त्या स्त्रियांना समजले की, हे श्रीकृष्ण नाहीत; कारण त्यांच्यापेक्षा याच्यामध्ये काहीतरी वेगळेपण आहे. तेव्हा त्या चकित होऊन आनंदाने या सुंदर दांपत्याकडे आल्या. कृष्णप्रभा भासुरापाङ्गी । पुत्रवियोगें कृशता आंगीं। आत्मजस्मरणें तत्प्रसंगीं। चेयिली सवेगीं सुतममता।जीचें अमृतोपम भाषण। गतपुत्राचें करितां स्मरण । पान्हा दाटोनि स्रवती स्तन । बाष्पे नयन डळमळिती ।पुत्रमोह भरला पोटीं । तेणें सद्गदित जाली कंठीं । थरथरां कांपे अंगयष्टि । रोमाञ्च उठी सर्वाङ्गीं ।स्वेदें पाझरे सर्व तनु । करतळीं बाष्प परिमार्जून । पाहे निवान्त करूनि मन । लावण्य पूर्ण मदनाचें ।सकान्त लक्षूनि स्वरूपता । सशोक विस्मयापन्न चित्ता । हृदयीं कल्पी त्या वृत्तान्ता । कौरवनाथा अवधारिं ।
त्याचवेळी डोळय़ांच्या कडा काळसर असलेली, पुत्र वियोगाने कृष झालेली रुक्मिणी तेथे आली. आपल्या हरवलेल्या पुत्राचे तिला स्मरण झाले आणि तिची पुत्र ममता ओसंडून आली. मधुरभाषिणी रुक्मिणीला आपल्या हरवलेल्या पुत्राचे स्मरण होताच पुत्रप्रेमाने तिच्या स्तनात पान्हा दाटून आला व स्तनातून दूध स्त्रवू लागले. तिच्या डोळय़ात बाष्प दाटले.
ऍड. देवदत्त परुळेकर








