भगवान श्रीकृष्ण जांबवंताला म्हणाले-हे ऋक्षराज! आम्ही या स्यमंतकमण्यासाठी तुझ्या या गुहेत आलो आहोत. या मण्यामुळे माझ्यावर आलेला खोटा आळ मी पुसून टाकू इच्छितो.
कृष्ण बोलिला इतुकें वाक्मय । विवरूनि तयाचा सद्विवेक । केलें जाम्बवतें कौतुक । जगन्नायकतोषार्थ। जाम्बवती स्वदितारत्न । कन्या अष्टवार्षिकी जाणोन । मणि देऊनियां आंदण । कृष्णार्पण ते केली । जो कां विधीचा अवतार । जाम्बवत ऋक्षेश्वर ।
तेणें श्रृंगारिलें मंदिर । सुहृद अपार मेळविले ।
श्रीकृष्णाचे म्हणणे ऐकून विवेकी भक्तराज जांबवंताला अत्यंत आनंद झाला. आपल्याकडे देवाला देण्यासारखे काही आहे आणि देवाच्या आपण उपयोगी पडत आहोत याचा त्याला अपार आनंद झाला. जांबवंत व त्याची पत्नी व्याघ्री यांना एक अत्यंत सुंदर व सगुण संपन्न कन्यारत्न होते. तिचे नांव जाम्बवंती! ती कन्या आता लग्नाला योग्य अशा वयात आली होती. जांबवंताने आपली कन्या श्रीकृष्णाला पत्नी म्हणून द्यावयाची व लग्नात आंदण म्हणून जावयाला स्यमंतकमणी द्यायचे ठरविले. त्याने लग्नाची तयारी केली. गुहा सजवली. सुहृदांना जमवले.
जाम्बवती लावण्यखाणी । कृष्णकृपेच्या अवलोकनीं । कमनीय जाली कमळेहूने । तेणें तरणी लाजविला ।
किंपुरुषाच्या विधानसूत्रें । पाणिग्रहण कमळामित्रें ।
करूनि तोषविला सर्वत्रें । अद्भुत चरित्रें तीं ऐसीं ।
एकी करिती अक्षवाणें । एकी आस्वली हरिद्राउटणें ।
एकी लेवविती आभरणें । एकी वसनें नेसविती।
नृत्यवाद्यादि गायनें । सुहृदीं अर्पिलें उपायनें ।
दिव्य रत्नें मणिभूषणें । वोहराकारणें लेवविलीं ।
अमृतोपहार नैवेद्यासी । फळें अर्पिलीं विविधा रसीं ।
ज्यांच्या सेवनें शरीरासी । अमरा ऐसी दिव्य कळा ।
आंगीं जरेचें न शिवे वारें । आधि व्याधि न संचरे ।
बळ प्रज्ञा प्रताप स्फुरे । चापल्य समेरें समसाम्य ।
धवळमंगळीं ऋक्षाङ्गना । वोहरा करिती निंबलोणा ।
सप्तस्वरिं सामगायना । आशीर्वचना समर्पिती।
एवं कृष्णार्हणाप्रति । अर्पिली सरत्न जाम्बवती ।
सप्रेमभावें ऋक्षपति । किंकरवृत्ति राहिला ।
कृष्णचरणीं ठेवोनि माथा । स्नग्धिवात्सल्यें निरवी दुहिता ।
राहवूनियां सुहृदआप्तां । जाता झाला बोळवित ।
जांबवंती मुळातच लावण्याची खाण होती. त्यात श्रीकृष्ण कृपेने ती कमळाहून कोमल झाली. तिचे सौंदर्य पाहून सूर्यही तिच्या तेजापुढे फिका पडला. काही अस्वली अक्षतावण करू लागल्या, काही वधूला उटणे लावू लागल्या, काही वधूला वस्त्रे नेसवू लागल्या तर काही दागिने चढवू लागल्या. नृत्य, मंगल वाद्य वादन, गायन होऊ लागले. सुहृदांनी वधूवरांना दिव्य रत्ने, दागिने व उपाहार अर्पण केले. अमृताच्या चवीची रसाळ फळे भोजनात होती. त्यांच्या सेवनाने शरीराला जणू अमरत्वाचा सुदृढपणा येत होता. या दिव्य फळांच्या सेवनाने अंगात ताप शिरू शकत नव्हता, आधिव्याधी दूर राहत, बळ येत होते, बुद्धी प्रज्ञा तेज होत होती, अंग चपळ होत होते. वर वधू वरून लिंबलोण उतरले. सामगायन करण्यात आले. सर्व उपस्थितांनी वधूवरांना मंगल आशीर्वाद दिले.
देवदत्त परुळेकर








