कृष्णेच्या पाणीपातळीत घट : आंतरराज्य वाहतूक सुरू : वाहनधारकांचा फेरा वाचला
वार्ताहर /कुडची
रायबाग तालुक्यात कृष्णा नदीवर असलेल्या कुडची येथील पुलावर दि. 23 जुलै रोजी महापुराचे पाणी आले होते. त्यामुळे जमखंडी-सांगली मार्गावरील आंतरराज्य वाहतूक बंद झाली होती. परिणामी सुमारे 40 किलोमीटर फेऱयाने वाहनाधरकांना प्रवास करावा लागला. बुधवारी दुपारी तब्बल 13 दिवसांनी पाणी ओसरल्याने कुडची पूल वाहतुकीस खुला झाल्याने वाहनधारकांतून समाधान व्यक्त होत आहे.
कृष्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने पाणीपातळी स्थिर होती. त्यामुळे नदी काठावरील गावांना चिंता लागली होती. धोका वाढल्याने प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देऊन सुरक्षितस्थळी स्थलांतरित केले होते. कुडची पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक शिवराज दरीगौड यांनी बंदोबस्त ठेवला होता. आता पूल खुला झाल्याने प्रशासनाने देखील सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
पावसाचा जोर कायम राहिल्याने आंतरराज्य वाहतुकीसाठी महत्त्वाचा दुवा असलेल्या कुडची पुलावर पाणी होते. त्यामुळे जमखंडीहून सांगलीला हारूगेरी क्रॉस, अथणी, कागवाडमार्गे सुमारे 40 किलोमीटर फेऱयाने तर रायबागहून अंकली, मांजरी, कागवाडमार्गे 30 किलो मीटर फेऱयाने जावे लागले. आता रस्ता खुला झाल्याने वाहनधारक व प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
भरपाईकडे लागले लक्ष
पूर तेरा दिवस राहिल्याने कृष्णा नदीकाठावरील गावातील घरांच्या पडझडीसह ऊस, सोयाबीन, भुईमूग व अन्य शेतीपिकांचे नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त बनले आहेत. त्यांची भरपाई कधी मिळणार याकडे लक्ष लागले आहे.
भोज-कुन्नूर वाहतूक पूर्ववत
वेदगंगा नदीला आलेल्या महापुरामुळे भोजवाडी-कुन्नूर दरम्यान असलेल्या बंधाऱयावर पाणी आल्याने सदर मार्ग वाहतुकीस बंद झाला होता. दरम्यान पावसाने विश्रांती घेतल्याने सदर मार्गावरील पाणी ओसरले आहे. यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्ववत सुरू झाली आहे. संततधार पावसामुळे वेदगंगा नदीच्या पाणीपातळीत झपाटय़ाने वाढ होताना येथील भोजवाडी-कुन्नूर बंधारा पाण्याखाली गेला होता. यामुळे भोज, बेडकिहाळ, सदलगा, शमनेवाडी, गळतगा आदी गावांना जाणाऱया प्रवाशांना निपाणीला जात प्रवास करावा लागत होता. त्यामुळे पैशासह वेळेचा अपव्यय होत होता. दरम्यान, गत आठ दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याने तब्बल 13 दिवसांनी भोजवाडी-कुन्नूर बंधाऱयावरील पाणी ओसरले आहे.