वार्ताहर / एकसंबा :
कोयना, वारणा, राधानगरी, काळम्मावाडी, कन्हेर, पाटगाव आदी धरणक्षेत्रात मुसळधार कोसळणारा पाऊस कमी झाल्याने धरणामधून सोडण्यात येणारे पाणी कमी झाले आहे. असे असले तरी गुरुवारी कृष्णा नदीत दोन फुटांनी तर दूधगंगा नदीची पाणीपातळी एका फुटाने वाढली आहे. कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढच होत असल्याने कृष्णाकाठी धास्ती कायम आहे.
पाणलोट क्षेत्रात 250 ते 300 मि. मी. पडणारा पाऊस गुरुवारी मात्र 60 मि. मी. च्या आतच पडत होता. पावसाचे प्रमाण कमी झाल्याने धरणातून होणारा विसर्ग घटला आहे. बुधवारी प्रमुख पाच धरणातून 82508 क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात येत होता. तोच गुरुवारी 62194 क्युसेकने कमी झाला असून 20314 क्युसेक इतका विसर्ग कमी होत आहे. धरणातील विसर्ग वगळता संततधार पावसामुळे डोंगर खोऱयातून मोठय़ा प्रमाणात पाणी अद्यापही येत असल्याने कृष्णेच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे.
राजापूर बंधाऱयातून 1,98,333 क्युसेक तर दूधगंगा नदीतून 33,792 क्युसेक असे एकूण 2,32,125 क्युसेक पाण्याची आवक कल्लोळनजीक कृष्णा नदीत होत आहे. बुधवारच्या तुलनेत गुरुवारी राजापूर बंधाऱयातून 12458 क्युसेक, दूधगंगा नदीतून 704 क्युसेक असा एकूण कल्लोळ कृष्णा नदीत 13162 क्युसेकने प्रवाह वाढला आहे. वाढत्या पाणीपातळीमुळे दूधगंगा व कृष्णा काठावरील अनेक कुटुंबीयांनी गावामध्ये राहण्याची व्यवस्था करून घेतली आहे. पावसाचा जोर जरी नसला तरी पावसाचे वातावरण कायम असल्याने नदीकाठी धोका अद्यापही कमी झालेला नाही.
पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीत आवक
गुरुवारी कोयना धरणातून 11431 क्युसेक, कन्हेर धरणातून 2688 क्युसेक, वारणा धरणातून 2995 क्युसेक, राधानगरी धरणातून 1400 क्युसेक तर काळम्मावाडी धरणातून 1800 क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे. गुरुवारी राजापूर व दूधगंगा नदीतून कल्लोळ कृष्णा नदीत सकाळी आठ वाजता केलेल्या मोजमाप दरम्यानची आकडेवारी व दुपारी 2 वाजता मोजमाप केलेली आकडेवारी पाहता 6 तासात कृष्णेत 2583 क्युसेकने वाढ झाली आहे. यामुळे धरणातून विसर्ग कमी झाला असला तरी वरचेवर पडणाऱया पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीत आवक वाढत आहे.
पाणलोट क्षेत्रातील धरणामधील पाणीसाठा पाहता कोयना 87 टक्के, वारणा 92 टक्के, राधानगरी 98 टक्के, कन्हेर 89 टक्के, धोम 92 टक्के, पाटगाव 100 टक्के, काळम्मावाडी 93 टक्के इतका झाला आहे. पावसाचे प्रमाण पाहता कोयना 41 मि. मी., वारणा 35 मि. मी., काळम्मावाडी 24 मि. मी., नवजा 41 मि. मी., राधानगरी 58 मि. मी., महाबळेश्वर 47 मि. मी., पाटगाव येथे 20 मि. मी. पाऊस झाला आहे. मांजरी पुलाजवळ कृष्णेची पाणीपातळी 535.72 मीटर तर सदलगा येथे दूधगंगेची पाणीपातळी 536.75 मीटर इतकी आहे.









