सत्याचे मन ज्यावेळी कृष्णाकडे आकृष्ट झाले आणि तिने मनोमनी कृष्ण हाच आपला पती म्हणून निवडला त्यावेळी तिच्या सख्या चेष्टेने तिला म्हणू लागल्या – या कृष्णाची तर यापूर्वीच अनेक लग्ने झाली आहेत. याला अनेक बायका आहेत. लग्नानंतर तो तुझ्या वाटेला कसा काय येणार? या सर्वांच्या मनातील संशय दूर करण्यासाठीच कृष्णाने एकाच वेळी सात रुपे घेतली आणि तो त्या सात उन्मत्त बैलांना भिडला. वास्तविक त्याला एकटय़ालाच त्या सातही बैलांचा बंदोबस्त सहजच करता आला असता.
शूरसेनाचा नातु हरि । यालागीं नामें बोलिजे शौरि । तेणें सातही वृषभ एके हारी ।बांधोनि दोरिं आकर्षिले। दर्प भंगला त्या वृषभाचा । तेजोलोप जाला साचा । धर्म निथळे सर्वांगाचा । लोप शक्तीचा जाला पैं । ऐसियांतें चक्रपाणि । वोढिता जाला धरूनि कानीं। सभानायकां दाविलें नयनीं । प्रतिज्ञा जाणोनि आश्चर्य । जेंवि का÷ाचीं वृषभ घोडी।। दोर बांधूनि बाळक वोढी । सप्त वृषभां ते परवडी । केली रोकडी श्रीकृष्णें । हें देखोनि कोशलपति । आणि पुरजनींहि समस्ती।। जयजयकार केला प्रीति । नाग्नजिती हरिखेली । यादववीर थरारिले । तिहीं जयजयकार केले । कृष्णें नोवरीतें जिंकिलें । आतां वहिलें चला म्हणती ।
कृष्ण हा शुरसेनाचा नातू असल्याने त्याला शौरी असेही नाव आहे. त्याने आपले नाव सार्थ करत त्या सात उन्मत्त बैलांना लीलया वेसण घातली. त्यामुळे त्या बैलांची मस्ती जिरली आणि त्यांचे बळ खच्ची झाले. आता कृष्णाने त्यांना दोरीने बांधले. मूल लाकडी बैलांना ओढते तसा कृष्ण त्या बैलांना ओढू लागला. त्या बैलांना बंधन घालून कृष्णाने ज्यावेळी कोशलनरेश नग्नाजितासमोर हजर केले, तेव्हा त्याला आश्चर्य वाटले पण आनंदही झाला. सत्याचा आनंद गगनात मावेना. सर्व नगरवासीय लोकांनी व उपस्थित यादवांनी कृष्णाचा जयजयकार केला.
श्रृंगारूनियां नाग्नजिती । नेते जाले शिबिराप्रति।
कोशलराजा करी विनति । सप्रेमभक्ति यदुवर्या ।
म्हणे माझें पूर्वसंचित ।
होतें अनंतजन्मार्जित ।
तया पुण्ये । आजि येथ। कृष्ण जामात जोडला ।प्रतापें नोवरी जिंकिली पणी । त्यावरी माझी एक विनवणी। यथासूत्रे। विधिविधानीं । पाणिग्रहणीं वरावी।दासांमाजि गणूनि मातें । सनाथ कीजे श्रीभगवतें । चाऱही दिवस राहोनि येथें । मत्पूजेतें स्वीकरिजे ।ऐसें विनवितां कोसलपति । ऐकोनि तोषला कमलापति। शिबिरा नेऊनि नाग्नजिती । दिधली पुढती
रायातें ।
कोसलपती नग्नाजितने सप्रेमपणे कृष्णाला विनंती केली – हे यदुनायका! आपण आपल्या पराक्रमाने माझ्या मुलीच्या लग्नाचा पण जिंकला आहे. त्या सात उन्मत्त बैलांना वेसण घालणे ही सामान्य गोष्ट नाही. पण तुम्ही ती लीलया करून दाखवलीत. माझे पूर्वसंचित मोठे, आज माझे भाग्य फळाला आले आणि यदुनायक कृष्ण मला जावई म्हणून मिळाला. आता आपण चार दिवस येथे राहून यथाविधी माझ्या कन्येचे पाणिग्रहण
करावे.
देवदत्त परुळेकर








