वार्ताहर / शिरढोन
शिरढोन कुरुंदवाड मार्गावर इचलकरंजी कृष्णा पाईप लाईनच्या गळतीमुळे तेथील सावगावे यांच्या शेतीसह ऊस पिकाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. याविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी संबंधित शेतकऱ्यांना इचलकरंजी नगरपालिकेकडून त्वरित नुकसान भरपाई मिळावी यासाठी रास्ता रोको केला. शिरढोन नदी पुलाजवळ रास्ता रोको केल्याने दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. दरम्यान सोमवार पर्यंत नुकसान भरपाई देण्याच्या अश्वासनानंतरच पाईप लाईन दुरुस्तिच्या कामाला सुरुवात करण्यात आली. यावेळी काही काळ वातावरण तणावपूर्ण होते. यावेळी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी नुकसान भरपाईच्या घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला.
दोन दिवसांपूर्वी शिरढोन कुरुंदवाड पुलानजीक सावगावे यांच्या शेताजवळ इचलकरंजी कृष्णा योजनेच्या पाईप लाईनला मोठ्या प्रमाणात गळती लागली होती. गळतीमधील पाण्याचा दाब इतका प्रचंड होता की मुख्य रस्त्यालगत असलेला भराव तुटून गेला.
शिवाय सावगावे यांच्या शेतातील दहा गुंठे आडसाली ऊस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले शिवाय शेतातील माती मोठया प्रमाणात वाहून गेल्याचे नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. याबाबत स्वाभिमानाचे विश्वास बालीघाटे, बंडू पाटील,रघु नाईक, बंडू उमडाळे, संतोष सावगावे, विशाल सावगावे आदींसह नगरसेवक उदय डांगे यांनी रास्ता रोको केला. यावेळी संबधीत अधिकाऱ्यांनी नुकसान भरपाई सोमवारपर्यंत देण्याचे कबूल केल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. त्यानंतर पाईप लाईन दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले.यावेळी इनपा अधिकारी, शेतकरी नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
Previous Articleवरळीला जाणाऱ्या बेस्टच्या मिनी बसला अपघात; 6 जण जखमी
Next Article सातारा तालुक्यात बाधितांचा आकडा वाढताच









