प्रतिनिधी/ कराड
रेठरे बुद्रुक (ता. कराड) येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी भोसले गटाचे विद्यमान संचालक धोंडीराम जाधव यांच्यासह सहा जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. याबरोबरच दिवसभरात 127 उमेदवारी अर्जांची विक्री झाल्याची माहिती निवडणूक कार्यालयातून देण्यात आली.
कारखान्याच्या वडगाव हवेली-दुशेरे गटामधून कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांचे समर्थक व विद्यमान संचालक धोंडीराम जाधव यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. हा अर्ज दाखल करताना पै. आनंदराव मोहिते, समाधान चव्हाण हे उपस्थित होते.
याबरोबरच विश्वास शिंदे कुसूर, गजानन जगताप कोडोली, तानाजी खबाले विंग यांनी या गटातून उमेदवारी अर्ज दाखल केले. या शिवाय रेठरे हरणाक्ष -बोरगाव गटातून संतोष दमामे बहे तर रेठरे बुद्रुक-शेणोली गटातून महेश कुलकर्णी रेठरे बुद्रुक यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. पहिल्या दिवशी सहा अर्ज दाखल झाले आहेत. दरम्यान दिवसभरात एकूण 127 अर्जांची विक्री झाली आहे. अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत 1 जूनपर्यंत आहे.








