स्यमंतकमणी गळय़ात घालून शिकारीसाठी वनात गेलेला प्रसेन परत आला नाही त्यावेळी सत्राजिताने आपला तर्क बोलून दाखवला-कृष्णाला माझा स्यमंतकमणी हवा होता. त्याने तो माझ्याकडे मागितलाही होता. पण मी त्याची हाव पूर्ण केली नाही. म्हणून मनात कपट धरून कृष्णानेच प्रसेनाचा घात केला असावा. माझा परम प्रिय बंधू स्यमंतकमणी गळय़ात घालून वनात शिकारीला गेला असता संधी साधून कृष्णानेच त्याला मारून स्यमंतकमणी पळवला असावा. सत्राजित बंधूच्या शोकात हे बोलला, ते ज्या लोकांच्या कानावर पडले ते परस्पर दुसऱयांना सांगू लागले.
कर्णोपकर्णीं हें वाक्मय कथन । उपांशु जपवत् वदती जन । द्वारकेमाजी थोर लहान । वदतां श्रवण सर्वत्रां ।
मुखाबाहेर गेलिया शब्द । सांवरूं न शके जरी प्रबुद्ध ।
यालागीं विवरूनि एकान्तवाद । करिती कोविद नयनिपुण । प्रमाद म्हणिजे असावधता । शोकवैकल्यें वदों जातां । विघ्नें कवळिलें सत्राजिता । तें कुरुनाथा अवधारिं । कर्णोपकर्णी ही वार्ता द्वारकेत एखाद्या वणव्याप्रमाणे पसरली.
लहान थोर सर्वच जण याची चर्चा करू लागले. सोडलेला बाण आणि बोललेला शब्द परत घेता येत नाही. मुखातून एकदा शब्द बाहेर पडला तर अत्यंत प्रबुद्ध, ज्ञानी व्यक्तिलाही तो सावरता येत नाही. तो शब्द आपले काम करतोच करतो आणि त्याचा परिणाम व्हायचा तो होतोच.
त्यामुळे विद्वान लोक एकान्तवाद पत्करून न्यायनिवाडय़ाची चर्चा करतात. उघडपणे कुणावरही आरोप प्रत्यारोप करीत नाहीत. असावधानता हा प्रमाद, गुन्हा आहे. शोकग्रस्त होऊन सत्राजित जे बोलला त्याचे परिणाम त्याला काय भोगावे लागले हे आता ऐक, असे महामुनी शुकदेव परिक्षिती राजाला सांगतात.
सर्वज्ञ श्रीकृष्ण अंतरवेत्ता । तथापि ऐकोन कुटीची वार्ता । मिथ्या अभिशाप आला माथां । तक्षालनार्थ प्रवर्तला ।उग्रसेनादि सभास्थानीं । बैसल्या समस्त यादवश्रेणी । तेथ स्वमुखें चक्रपाणि । दुर्यशोग्लानि प्रकट वदे।भोज अंधक माधव कुकुर । वृष्णिसात्वत दाशार्हप्रवर ।
समस्त यादव बैसलां गोत्र। तरी ऐका विचित्र दैवबळ ।
सर्वाम देखतां सभास्थानीं। प्रसंगोचित मी बोलिलों वाणी । नृपायोग्य हा स्यमंतकमणि । हें ऐकिलें श्रवणीं सत्राजितें ।
इतुकियावरूनि माजिया माथां । दुर्यशारोप केला वृथा । तुम्हीं गोत्रजीं ममहितार्था । क्षालनार्था प्रवर्तिजे ।हें ऐकोनि म्हणती गोत्रज । कर्णोपकर्णीं हे गुजगुज ।
ऐकत होतों तेचि सहज । गरुडध्वजें प्रकटिली ।
एक म्हणती शोकार्तवाणी । सहसा न धरिजेअंतःकरणीं । एक म्हणती स्यमंतकाहूनी । मणींच्या श्रेणी हरिसदनीं ।ब्रह्मादि देव आज्ञाधर । तेथ मणीचा कोण विचार । संकल्पमात्रे द्वारकापुर । करवी श्रीधर स्वसत्ता ।एक म्हणती सुधर्मा सभा । कृष्णें आणिलीऐश्वर्यलाभा । तेथ मणीची कायसी शोभा । किमर्थ क्षोभा वश होणें ।
एक म्हणती ऐसें नोहे । ऐश्वर्यक्षोभें जाऊं नये ।
सत्य मिथ्या मराळप्राय । निवडिजे न्यायें पय पाणी ।
Ad. देवदत्त परुळेकर








