सातारा / प्रतिनिधी :
अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका जिल्ह्याच्या पश्चिम भागाला बसला आहे. यामुळे बरीच जीवित व वित्त हानी झाली आहे. त्याचबरोबर भूस्खलन, दरडी कोसळणे आणि पुराचे पाणी शेतात शिरल्याने शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त भागांचे कृषी विभागातर्फे पंचनामे करण्यात येत आहेत. मागील चार दिवसांपासून हे पंचनामे करण्यास अधिकारी वर्गाकडून सुरूवात करण्यात आली आहे.
संबंधित भागात जाऊन त्या-त्या कृषी अधिकारी व पर्यवेक्षकांतर्फे हे पंचनामे करण्यात येत आहेत. येत्या आठ दिवसात हे पंचनामे करण्याची प्रक्रिया पुर्ण होईल. जिल्हय़ात सर्वाधिक नुकसान हे महाबळेश्वर, जावली व पाटण या भागात झाले आहे. तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी ही पिक नुकसानीच्या माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच माहिती देताना सर्व्हे नंबर किंवा गट नंबर व नुकसान क्षेत्र कळविणे ही आवश्यक आहे. याचबरोबर पिकांचे नुकसान झाल्यास जिल्हय़ातील शेतकरी नुकसानीची सुचना ‘भारती एक्सा जनरल इन्शुरन्स कंपनी लि. या विमा कंपनीला (टोल फ्री क्र.-18001037712) येथेही देता येईल. तसेच क्रॉप इंश्युरन्स ऍप, बँक, कृषी विभाग, महसूल विभाग यांनाही पिक नुकसान कळवता येईल. नुकसानीची संपुर्ण माहिती घेऊन शासनाच्या निर्णयानुसार संबंधितांच्या खात्यावर निधी जमा करण्यात येईल, असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.









