भाजपकडून अभिनंदन शेतकऱयांच्या हितासाठीच विधेयक
प्रतिनिधी/ पणजी
शेतकऱयांचे हित आणि सरंक्षण यासाठीच संसदेत दोन विधेयकांना मान्यता देण्यात आली असून गोवा प्रदेश भाजपने त्यासाठी मोदी सरकारचे अभिनंदन केले तर त्यास विरोध करणाऱया काँग्रेससह सर्व इतर पक्षांचा निषेध नोंदवला आहे.
माजी खासदार नरेंद्र सावईकर यांनी पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले की, शेतकरी विधेयकांना मान्यता हा मोदी सरकारचा ऐतिहासिक निर्णय असून यापूर्वी 50 वर्षे राज्य करूनही काँग्रेसला ती विधेयके मान्य करता आली नाहीत. त्यामुळे आता काँग्रेसने गळा फाढू नये, असे सांगून श्री. सावईकर यांनी विधेयकांचे स्वागत केले.
शेतकऱयांच्या उत्पादनाला योग्य ती किंमत मिळणार असून व्यापारी थेट शेतकऱयांच्या शेतात जाऊन बोलणी करून दर ठरवू शकतात. माल शेतकरी विकू शकतात. त्यामुळे मधले दलाल नष्ट होणार असून सर्व नफा शेतकऱयांना मिळणार आहे तर दलाली संपुष्ठात येणार असल्याचा दावा श्री. सावईकर यांनी केला आहे. पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा लाभ देशातील 10 कोटी शेतकऱयांना मिळाला असून गोव्यातील सुमारे 10 हजार पेक्षा जास्त शेतकऱयांना त्याचा फायदा झाल्याचे श्री. सावईकर यांनी नमूद केले. माजी आमदार तथा भाजप किसान मोर्चाचे अध्यक्ष वासुदेव मेंग गावकर हे यावेळी उपस्थित होते. त्यांनी सदर शेतकरी विधेयकाचे स्वागत केले आणि त्याचा मोठा फायदा शेतकऱयांना मिळणार असल्याचा दावा केला. त्या विधेयकाचे कायद्यात रुपांतर झाल्यावर गोव्यातील शेतकऱयांनी त्याचा लाभ करून घेण्याचे आवाहन श्री. गावकर यांनी यावेळी केले.









