अकाली दल-काँगेसमध्ये शब्दयुद्ध, पेगॅससवर चर्चेची मागणी
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
काँगेस नेते राहुल गांधी यांनी विरोधी ऐक्यासाठी प्रयत्न सुरु करण्याला चोवीस तासही उलटले नाहीत, तोच संसदेबाहेर नव्या कृषी कायद्यांवरून विरोधकांमध्येच शब्दयुद्ध झाल्याचे पहावयास मिळाले आहे. विरोधकांच्या ऐक्याच्या प्रयत्नांना हा मोठाच धक्का मानण्यात येत आहे. कृषी कायद्यांवरून अकाली दलाच्या खासदार हरसिमरत कौर आणि काँगेसचे खासदार रवनीत सिंग बिट्टू यांनी संसदेबाहेर एकमेकांच्या पक्षांवर जोरदार शाब्दिक चिखलफेक केली.
गेल्या वर्षी जेव्हा नव्या कृषीविधेयकांना केंद्रीय मंत्रिमंडळाने संमती दिली, तेव्हा अकाली दलाच्या हरसिमरत कौर मंत्रिमंडळात होत्या. त्यामुळे आज अकाली दल या कायद्यांना जो विरोध करीत आहे, ते निव्वळ नाटक आहे, असा आरोप काँगेसचे पंजाबचे खासदार बिट्टू यांनी केला. कौर यांनी नंतर राजीनामा दिला, असेही प्रतिपादन त्यांनी केले. या आरोपामुळे खवळलेल्या अकाली दलाने काँगेसवर टीकेची धार धरली. त्यामुळे विरोधी ऐक्याचे तीन तेरा झाल्याचे पहावयास मिळाले.
काँगेसचाही सहभाग
संसदेत नवी कृषी विधेयके चर्चेला आली असताना काँगेसने सभात्याग करुन विरोधकांचे संख्याबळ कमी केले. त्यामुळे दोन्ही सदनांमध्ये ही विधेयके सहजगत्या संमत झाली. राज्यसभेत रालोआकडे बहुमत नसतानाही ही विधेयके केवळ काँगेसच्या अनुपस्थितीमुळे संमत झाली. त्यामुळे आज काँगेस या कायद्यांना जो विरोध करीत आहे, तो तोंडदेखला असून ती केवळ नौटंकी असल्याचा पलटवार अकाली दलाने केला आहे. कौर आणि बिट्टू यांच्या संघर्षाचे जोरदार पडसाद उमटले.
पेगॅसस, कृषी कायद्यांवर चर्चा घ्या
प्रचंड गदारोळ माजवून आणि गोंधळ घालून संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आतापर्यंतचा बहुतेक कालावधी वाया घालवणाऱया विरोधकांनी आता सरकारकडेच पेगॅसस आणि नव्या कृषी कायद्यांवर चर्चा घ्या, असा घोषा लावला आहे. मंगळवारी काँगेस नेते राहुल गांधी यांच्यासह काही विरोधी नेत्यांनी चर्चा केली. त्यानंतर एक वक्तव्य प्रसिद्धीस देण्यात आले. त्यात हा आग्रह धरण्यात आला. सरकार चर्चेला केव्हाही तयार आहे. पण विरोधक कामकाज कुठे चालू देतात, अशी खोचक टिप्पणी भाजपने काही विरोधकांच्या या मागणीवर केली आहे.
तृणमूलचे सहा खासदार निलंबित
तृणमूल काँगेसच्या सहा खासदारांना राज्यसभेतून बुधवारी दिवसभरासाठी निलंबित करण्यात आले आहे. यापूर्वीच खासदार शंतनू सेन यांना अधिवेशनाच्या उर्वरित काळासाठी निलंबित करण्यग्नात आले होते. बुधवारी संसदेत गदारोळ करून कामकाजात व्यत्यय आणल्यामुळे डोला सेन, अर्पिता घोष, मोहम्मद नईम, अबीर रंजन बिस्वास, शांता छेत्रा आणि मौसम नूर या खासदारांना एक दिवसासाठी निलंबित करण्यात आले. राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांच्या कार्यालयाने एक वक्तव्य प्रसिद्ध करुन या कारवाईची माहिती दिली.
पत्रकारांसमोरही टीकेचे वार
सरकारविरोधात विरोधक एकत्र येऊ शकत नाहीत का? असा प्रश्न काही पत्रकारांनी बिट्टू यांना विचारला. त्यावर उसळून त्यांनी ‘कसली विरोधी एकता? अकाली दलाने या विधेयकांना संमती देण्यात महत्वाची भूमिका बजावली. आता तेच काँगेसवर जबाबदारी ढकलत आहेत, असा प्रतिवार केला.
युएपीएत 34 जणांना शिक्षा
बेकायदेशीर कृत्य विरोधी कायद्यांतर्गत (युएपीए) देशात गेल्या एका वर्षात 1,948 जणांना अटक करण्यात आली आहे. तर याच कायद्याच्या अंतर्गत 34 जणांना शिक्षा करण्यात आली आहे. एक वर्षाच्या काळात देशात पोलीस कोठडीत 350 जणांचा मृत्यू झालेला आहे, अशी माहिती राज्यसभेत देण्यात आली.









