प्रतिनिधी / सातारा :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तीन कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली. मोदींच्या या निर्णयाचे स्वागत करत सातारा येथील कार्यालयामध्ये राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे यांच्यासह कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांना पेढे भरवून आनंदोत्सव साजरा केला. तसेच फटाके फोडून जल्लोष केला.
यावेळी तेजस शिंदे म्हणाले, केंद्र शासनाने जे कायदे केले होते. त्यांना शेतकऱ्यांनी विरोध केला होता. हा कायदा मागे घेण्यासाठी दिल्लीत तब्बल वर्षभर आंदोलन सुरू होते. अखेर आज हे कायदे मागे घेण्याची घोषणा पंतप्रधान मोदींनी केली. केंद्र सरकारच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. हाच निर्णय वेळेवर घेतला असता तर 700 ते 800 शेतकऱ्यांना आपले प्राण गमवावे लागले नसते. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांची याविरोधातील लढाई ही शेतकऱ्यांच्या फायद्याची ठरलेली आहे. जेव्हा-जेव्हा शेतकऱ्यांवर अन्याय होईल तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पाठीशी राहिल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
यावेळी गोरखनाथ नलावडे, युवराज पवार, अतुल शिंदे, समीर राजेघाटगे, विक्रांत शिर्के, शुभम साळुंखे, विकास अवघडे, प्रथमेश पवार आदी उपस्थित होते.









