प्रतिनिधी / बेंगळूर

अखेर राज्य सरकारने अधिकृतपणे खतांचा दर जाहीर केला आहे. केंद्र सरकारने दिलेल्या अनुदानाच्या आधारावर खतांचा दर ठरविण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱयांना दिलासा मिळाला आहे. कृषीमंत्री बी. सी. पाटील यांनी खतांचे नवे दर जाहीर केले असून आपल्या फेसबुक आणि ट्विटर खात्याद्वारे ही माहिती त्यांनी शेतकऱयांपर्यंत पोहोचविली आहे
केंद्र सरकारने दिलेल्या अनुदानाच्या आधारावर विविध कंपन्यांच्या खतांचे दर जाहीर करण्यात आले आहेत. एखाद्यावेळेस अधिक दराने खतांची विक्री करत असल्याचे आढळून आल्यास सदर व्यापाऱयांविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून खतांचा दर निम्म्या किंमतीने वाढला होता. त्यामुळे शेतकरी समुदाय आर्थिक संकटात होता. मात्र, आता केंद्र सरकारकडून अनुदान मिळत आहे. त्यामुळे पूर्वीप्रमाणेच खतांचा दर जाहीर करण्यात आला असल्यामुळे शेतकऱयांना थोडासा दिलासा मिळाला आहे.
केंद्र आणि राज्य सरकारने खतांच्या दराबाबत अधिकृत घोषणा केल्याने शेतकऱयांमधील संभ्रमावस्था दूर झाली आहे. 20 मे महिन्यापासून निश्चित किंमतीतच खतांची विक्री करण्याची ताकीद देण्यात आली आहे. सध्या बाजारपेठेत नव्या दरांचे खत असले तरी ते खत निश्चित केलेल्या दरातच विकण्याची सूचना करण्यात आली आहे. त्याचा शेतकरी बांधवांनी सदुपयोग करून घ्यावा, असे आवाहन कृषीमंत्री बी. सी. पाटील यांनी केले आहेत.









