त्या दिवशी निमाकडे गेले होते. निमाचा मुलगा कुणाल. आला तोच तणतणत. ‘मला कुणाचीही गरज नाही. जगेन माझा मी. किती केलं दुसऱयासाठी तरी कुणाला किंमत आहे? मला कधी कुणी समजून घेतलंय? हवी कशाला ही नाती? माणसाचा जन्मच नको मुळात.’
‘अरे हो..हो..पण काय झालं ते नीट सांगशील का?’ ‘जाउ दे गं मावशी’ असं म्हणत कुणाल निघून गेला.
‘तू लक्ष देऊ नको. चहा घे. येईल थोडय़ा वेळाने. अगं तो असाच आहे. येईल जाग्यावर. त्याला वाटतं कुणी आपल्याला समजूनच घेत नाही. अधेमधे कुरकुर सुरूच असते.’
कुणालची अस्वस्थता पाहिली आणि त्या दिवशी अश्विनीची झालेली भेट आठवली. तीही भेटायला आली ती अस्वस्थ मनःस्थितीत.
‘काय गं. काय झालं? काही विशेष नाही गं. माझी मैत्रिण रिमाला कसं समजवावं तेच कळत नाही. कशाचं म्हणून समाधान नाही. सतत तुलना. माझ्याकडे अमुक गोष्ट आहे पण तिच्यासारखी नाही. तसं असतं तर किती बरं झालं असतं, नोकरी करायलाच नको होती. त्यापेक्षा व्यवसाय बरा. आज मी जिथे आहे ना त्यापेक्षा बाहेर असते तर जास्त प्रगती केली असती. प्रत्येक वेळी ‘असं असतं तर बरं झालं असतं’ हे तिचं पालुपद संपतच नाही. काही सांगायला गेलं की ‘मला कुणी समजूनच घेत नाही. मला माणसांचा कंटाळा आलाय. कुणी नकोच वाटतं हल्ली. कुणाची गरज नाही मला. या गोतावळय़ात असण्यापेक्षा एकटं राहिलेलं बरं. खरंच सुखी होईन मी.’ असं काहीतरी बोलते. काहीवेळा वाटतं ही काही सांगायच्या पलीकडे आहे. पण मैत्रिण आहे म्हणून जीव तुटतो गं. मला कुणाची गरज नाही म्हणणं सोप आहे. पण ही किरकीर बाहेर काढायला तरी कुणाची गरज आहे की नाही सांग मला.’
मला हसू आलं. खरंच मला कुण्णा कुण्णाची गरज नाही. माझा/माझी मी जगेन म्हणणे ठीक आहे. परंतु खरंच हे एवढे सोपे आहे का? या जगातले सगळे प्राणीसुद्धा एकमेकांवर अवलंबून असतात मग समाजात राहणाऱया माणसांचा अपवाद कसा असेल? प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे आपण सगळे एकमेकांच्या मदतीने, सहाय्याने जगतो. तसे परस्परावलंबी असतो. एकमेकांना समजून घेत जगल्याने आयुष्यातला आनंद वाढतो. गंमत म्हणजे आपल्यापैकी प्रत्येकाला अधूनमधून कधीतरी असे वाटते की आपल्याला कुणी समजून घेत नाही. परंतु खरंच असं आहे का? यावर नीट विचार केला नाही, आत्मपरीक्षण केले नाही आणि माझे तेच खरे अशा अट्टहासातून वाटचाल झाली तर मग आयुष्य एकसुरी वाटू लागते. आयुष्याचा आनंद घेण्याऐवजी ते कंटाळवाणे, नीरस वाटू लागते. खरंतर हे आयुष्य मिळाले आहे यासाठी आपण कृतज्ञ असायला हवे परंतु प्रत्यक्षात तसे होते का?
आपल्या रोजच्या आयुष्यात क्वचित कधी आपल्या असे मनात येते का, की आपल्याला हे आयुष्य जगायला मिळते आहे, त्याबद्दल आपण कृतज्ञ असावे! जीवन ही आपल्याला मिळालेली सुंदर देणगी. जी छोटय़ा मोठय़ा आनंदामध्ये जाणवत राहते आणि खरंतर जाणवायला हवी. म्हणजे बघा हं, ए आई वा अहो बाबा करत गळय़ात पडणारा/पडणारी लेक, आपण दिसताक्षणी खुदकन् हसून आपल्याकडे झेपवणारे निरागस तान्हे बाळ, आपल्याला कामात मदत करणाऱया मदतनीस, फोन करून दिलखुलास गप्पा मारणारे, प्रसंगी धावून येणारे मित्र मैत्रिणी, आपल्यासाठी आठवणीने काही मागे करून ठेवणारी कुटुंबातील माणसे, येता येता सहज बायकोसाठी एखादी आवडती गोष्ट घेऊन येणारा नवरा आणि नवऱयाची आवडती वस्तू दिसताक्षणी आणणारी बायको, कधी अचानक मिळणारा आयता चहा, कधी पैसे सुट्टे नसताना, एक रुपया तर आहे ताई.. राहु द्या हो.. असे म्हणत पैसे कमी घेऊन जाणारा रिक्षावाला किंवा बस कंडक्टर, मुक्त रंगाची उधळण करणारा निसर्ग, निसर्गाचा लपंडाव.. या आणि अशा अनेक गोष्टी त्या त्या वेळी आपल्याला सुखावून जात असतातच ना? मग अशा आनंदाच्या मुठी चिमटींनी आपली झोळी भरत या अगणित देणग्यांची जाणीव मनात बाळगत
प्रसन्न राहणे सोपे आहे की नाही?
तसे पहायला गेले तर कधी कधी अगदी सुरळीत असे आपले आयुष्य चाललेले असते. ते सुरू असताना आपल्याला सुरळीत जगायला मिळते आहे, विशेष तणाव नाही, कुटुंब, मित्र-मैत्रिणी चांगल्या आहेत, आपले आरोग्य चांगले आहे, नीट जेवायला मिळते आहे, रुटिन सुरळीत सुरू आहे, आपल्याकडे काम आहे आणि आपण ते करू शकतो आहोत यात आपण खरंच किती भाग्यवान आहोत याचा आपल्याला विसर पडतो वा त्याकडे तसे पाहिले जात नाही. काहीवेळा तर आपण असे वागत असतो की जणू अमरत्वाचा पट्टाच घेऊन आलो आहोत. ज्यावेळी अचानक एखादी गोष्ट नाहीशी होते त्यावेळी त्याच्या असण्यातले सुख प्रकर्षाने जाणवते परंतु ते परत मिळणार नसते म्हणून आज जे आहे त्याचा जाणीवपूर्वक कृतज्ञतेने उपभोग घ्यावा. एकमेकांसाठी आतून काही करावे. विचार करून पहा हं.. शक्मय आहे परंतु आपण करत नाही अशा कितीतरी गोष्टी आहेत. आपल्या कुटुंबातील, परिचयातील वृद्ध मंडळी यांना आपण कितीवेळा आवर्जून भेटतो? फोन करतो? नात्यातील किंवा आपल्या मित्र मैत्रिणींपैकी कुणाला यश मिळाले तर त्यांची भेट घेऊन कौतुक करतो, शाब्बासकी देतो? अगदी ते शक्मय नसेल तर किमान एखादा फोन करतो? की केवळ वॉट्सअप वरच अभिनंदनाचा संदेश पाठवतो? पती पत्नी एकमेकांसाठी, मुलांसाठी वा आई वडिलांसाठी सहज म्हणून (विशेष कारण नसताना) एखादी भेटवस्तु कौतुकाने आणतात का? एखादी गोष्ट करायची आहे, पण केली नाही. पुस्तक वाचायचे आहे परंतु वाचले नाही. कुणाला तरी थँक्मयु म्हणायचे आहे, कुणाला तरी सॉरी म्हणायचे आहे पण म्हटले नाही. अशा किती गोष्टी आपण करुया म्हणून टाळत राहतो वा त्या राहून जातात. याचा प्रामाणिक विचार प्रत्येकाने करायला हवा. कारण ही न संपणारी यादी तशीच राहून जाऊ शकते. त्यामुळे छोटय़ाशा वाटल्या तरी या गोष्टी करायला हव्यात कारण त्यातून मिळणारा आनंद, समाधान वेगळे असते. आजच्या गतिमान आणि स्पर्धेच्या युगामध्ये खरंखुर आतून प्रसन्न रहायला शिकायचे असेल तर कृतज्ञतापूर्वक जगण्याचा प्रयत्न करायला हवा. छंदाची जोपासना, स्वतःमध्ये डोकावून पाहणे, आपली मूल्यधारणा तपासणे आणि आवश्यक ते बदल करण्यासाठी लवचिक असणे गरजेचे आहे. जीवनात अनेक क्षण येतात आणि जातात. अनेक माणसे भेटतात. कधी त्यांच्याशी संवाद होतो तर कधी विसंवाद. आपण शक्मयतो मन शांत ठेवायला शिकावे. बारीकसारीक गोष्टींवर राग धरणे, रुसणे, सूड उगवणे, आपण तणावाखाली जगणे आणि इतरांच्या ताणाला कारणीभूत होणे या गोष्टी नंतर निरर्थक वाटू लागतात. विचार केला तर लक्षात येईल की काही वर्षानंतर या सगळय़ाला किती महत्त्व असणार? शून्य. म्हणून आयुष्याचा आताचा क्षण आनंदात घालवावा. भविष्याचा विचार जरूर असावा पण त्याचे ओझे बनू न देता ‘वर्तमानाचे मिळालेले प्रेझेंट’ कृतज्ञतापूर्क जपले तर आयुष्याचा आनंद द्विगुणित होईल हे मात्र नक्की!
-ऍड. सुमेधा संजीव देसाई








