कूटश्लोक म्हणजे कोडे घालणारा श्लोक. मनोरंजक पण बुद्धीची परीक्षा पाहणारे प्रश्न. थोडे डोके चालवले की, त्याचे उत्तरही कळते. पण त्याहीपेक्षा त्या श्लोकाच्या रचना करणाऱया कवीच्या बुद्धिमत्तेचे कौतुक वाटते आणि आदरही दुणावतो. असेच काही श्लोक आज पाहूया. भोजराजा आणि कालिदासाच्या काव्यप्रतिभेबद्दल आपण यापूर्वी वाचले आहे. एकदा भोजराजाने एका श्लोकातच कालिदासाला कोडे घातले.
भारतं ईक्षुदण्डं च कलानाथं च वर्णय।
कालिदासो कविर्ब्रूते ‘प्रतिपर्वरसावहम्’।।
अर्थ-महाभारत, ऊस आणि चंद्र (कलानाथ) यांचे वर्णन एका शब्दात कर. त्यावर कालिदासाने एका शब्दात सांगितले, ‘प्रतिपर्वरसावह’ म्हणजे महाभारताचे प्रत्येक पर्व रसाळ आहे, उसाच्या प्रत्येक पेरात रस आहे आणि चंद्राची प्रत्येक कला कल्याणकारी आहे! आहे की नाही काव्यप्रतिभेची जुगलबंदी? कालिदासाला ‘कविकुलगुरु’ का म्हणतात ते कळले ना? आता दुसरा एक श्लोक पाहूया.
युधि÷िर: कस्य पुत्रो गङ्गा वहति कीदृशी।
हंसस्य शोभा का वास्ति धर्मस्य त्वरिता गतिः।।
अर्थ-युधि÷िर कोणाचा मुलगा? गंगा कशी वाहते? हंसाचे सौंदर्य कशात असते? धर्माची त्वरित गति असते. वरील श्लोकात तीन प्रश्न आहेत. चौथ्या चरणात एक अर्थपूर्ण वाक्मय आहे. पण त्या वाक्मयातील प्रत्येक शब्द हा क्रमाने प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आहे. म्हणजे युधि÷िर धर्माचा पुत्र, गंगा जलदगतीने वाहते आणि हंसाचे सौंदर्य त्याच्या चालण्यात असते! आहे ना गंमत? आता पुढील श्लोक वाचून कोडय़ाचे उत्तर शोधा.
कमले कमलोत्पत्तिः श्रूयते न तु दृश्यते।
बाले तव मुखाम्भोजे कथं इन्दिवर-द्वयम्।।
अर्थ-(एक तरुण मुलगी म्हणते) कमळातून लक्ष्मी उत्पन्न झाली असे ऐकले आहे, पण प्रत्यक्षात दिसत नाही. हे किशोरी, मग तुझ्या मुखकमलावर ही दोन कमळे (इन्दिवर-द्वयम्) कशी? शोधताय ना उत्तर?








