हाही प्रहेलिकेचा एक प्रकार. कोडेच म्हणा ना! ह्यातील शब्द आपल्या नेहमीच्या बोलण्यात वाचनात असतात. त्या अनुषंगाने आपण अर्थ लावल्यास ते हास्यास्पद होते. पण वरवर माहीत असणाऱया ह्या शब्दांचे दुसरे अर्थ माहीत नसतात. म्हणजेच त्या अर्थाने आपण ते शब्द कधी वापरतच नाही. त्यामुळे तो दडलेला अर्थ जेव्हा आपल्याला समजतो, तेव्हा आपण चकितच होतो आणि एक नवीन अर्थ समजल्याचा आनंदही होतो. आता हाच श्लोक पहा ना..
शंकरं पतितं दृष्ट्वा पार्वती हर्षनिर्भरा । रुरुदु: पन्नगाः सर्वे हा हा शंकर शंकर ।। श्लोक वाचल्यावर आपल्याला वरवरचा अर्थ समजतो तो असा….शंकराला पडलेले पाहून पार्वती आनंदित झाली. तेव्हा सर्व साप ‘अरे शंकर(पडला),शंकर (पडला)’ असे ओरडले (रुदन्ति). अर्थ वाचून आपल्याला हसूच येईल. शंकर पडल्यावर पार्वतीला आनंद होईल का? आणि साप (पन्नगाः) ओरडल्याने म्हणजेच फुत्कार टाकल्याने पार्वतीला ते कळेल का? खरं तर शंकर पडला, तर त्याच्या गळय़ातील सापही पडणार. तो शंकराच्या नावाने कशाला ओरडेल? इथेच खरा कूटप्रश्न आहे. ह्या शब्दांचा अप्रचलित अर्थ कळला की, श्लोकाचा अर्थ समजणे सोपे होते. या श्लोकात काही शब्दांचे वेगळे अर्थ असे आहेत. शंकर-चांगल्या जातीचे चंदनाचे झाड, पार्वती-पर्वतावर राहणारी (आदिवासी) स्त्री. पन्नगाः -कावळे, रुरुदुः-ओरडले. आता आपल्याला योग्य अर्थ लावता येईल. तो खालीलप्रमाणे- चंदनाचे झाड पडल्यावर पर्वतावर राहणारी आदिवासी स्त्री आनंदित झाली. तर त्यावर राहणारे कावळे ‘अरे चंदनाचे झाड पडले, झाड पडले’ असे ओरडले! आदिवासी स्त्रिया पडलेल्या किंवा वाळलेल्या झाडांच्या फांद्या तोडून त्याचा उपयोग सरपणासाठी करतात. इथे चंदनाच्या झाडाचे महत्त्व नाही तर भरपूर सरपण साठवता येईल म्हणून ती आनंदी झाली. मलये भिल्लपुरंध्री चंदनतरूका÷ं इन्धनं कुरुते। ह्या श्लोकाची इथे आठवण येते. मलय पर्वतावर चंदनाचीच झाडे असल्याने भिल्ल स्त्रियांना त्याचे मोल नाही. त्या नेहमी सरपण म्हणून चंदनाच्या लाकडांचाच वापर करतात. ज्यांनी चंदनाचे झाड पाहिले नाही, त्यांनाच त्याचे मोल समजणार. अतिपरिचयात् अवज्ञा दुसरे काय? आता असाच दुसरा श्लोक पहा आणि बघा अर्थ समजतो का? केशवं पतितं दृष्ट्वा द्रोणो हर्षमुपागतः। रुदन्ति कौरवाः सर्वे हा केशव कथं गतः।। सरलार्थ- केशवाला(कृष्ण) पडलेला पाहून द्रोणाचार्य आनंदित झाले तर सर्व कौरव ‘अरेरे, हा केशव कसा गेला?’ असे म्हणून रडू लागले! काही शब्दार्थांच्या आधारे प्रयत्न करा. केशव- के शव (प्रेत), द्रोणः-कावळा, कौरवाः-कावळे.
बघा प्रयत्न करून खरं आहे का?