वार्ताहर / जांबोटी
बेळगाव-चोर्ला राज्य महामार्गावर कुसमळीनजीक खासगी आराम बस पलटी होऊन सात प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची घटना गुरुवारी पहाटे घडली.
या बाबतची अधिक माहिती अशी की, ऑरेंज टुर्स ऍन्ड ट्रव्हलर्स कंपनीची के. ए. 51 ए. डी-0484 या क्रमाकांची आराम बस हैद्राबादहून गोव्याकडे जात होती. सदर बसमध्ये 35 प्रवासी प्रवास करीत होते. परंतु बस भरधाव असल्यामुळे गुरुवारी पहाटे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्यामुळे बस कुसमळी गावानजीकच्या धोकादायक वळणावर रस्त्याच्या बाजूला पलटी झाली. त्यामध्ये बसमधील सुमारे 7 प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. सुदैवाने जीवितहानी टळली.
बस पलटी झाल्याचे समजतच रस्त्याबाजूला असलेल्या माजी ग्रा. पं. सदस्य शिवाजी बेळगावकर यांनी जखमी प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करून लागलीच 108 रुग्णवाहिकेला पाचारण करून उपचारासाठी बेळगावला पाठविले. बेळगाव-चोर्ला महामार्गावरील कुसमळी गावानजीकच्या धोकादायक वळणावर वारंवार अपघात घडत आहेत. या ठिकाणीचे धोकादायक वळण हटवावे, अशी मागणी वाहनधारकांमधून होत आहे.