वारणानगर / प्रतिनिधी
कुशिरे ता. पन्हाळा येथील औद्योगिक वसाहतीत प्लास्टो कंपनीची बनावट टाकी बनवणारी प्लास्टो लाईन कंपनी दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशाने कंपनीच्या कायदेशीर सल्लागार व नेमलेल्या स्थानिक कोर्ट कमिशनने कोडोली पोलीसांच्या उपस्थितीत शील केली प्लास्टो कंपनीची महाराष्ट्रातील ही पहिलीच कारवाई आहे.आरसी प्लास्टो टँक अँड पाईप्स प्रायव्हेट लिमिटेडचे कायदेशीर सल्लागार आशिष विश्वकर्मा, नवकार असोसिएट्सचे वकील आणि आयपीआर सल्लागार विजय सोनी, नम्रता जैन यांनी गुरुवारी कुशीरेतील बनावट टाकी तयार करणाऱ्या प्लास्टो लाईन कंपनीवर मोठी कारवाई केली.
प्लास्टोलाईनच्या नावाने कंपनीमध्ये टाक्या विकल्या जात आहेत ज्यावर लिहिलेले आहे की प्लॅस्टो प्लास्टिकच्या टाक्या आरसी प्लास्टो टॅक्स अँड पाईप्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या नोंदणीकृत ट्रेडमार्क आणि नोंदणीकृत कॉपीराइट शैलीचा वापर करून प्लास्टोलाइनच्या नावाने बाजारात विकल्या जात आहेत. अशा तक्रारी कंपनीला कोल्हापूरच्या एका कंपनीकडून सातत्याने तक्रारी येत होत्या. याची दखल घेवून ही कारवाई केली.
कोल्हापूर येथील पोतदार हे कुशिरे येथे प्लास्टो लाईन कंपनी चालवत होते. त्यांनी दिल्ली न्यायालयाने नेमलेल्या स्थानिक कमिशनला सहकार्य करीत न्यायालयात उपस्थित रहाण्याची नोटीस स्विकारली आहे. या कारवाईमुळे कंपनीकडे काम करणाऱ्या सुमारे वीस एक कामगारांचा रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. कुशिरे औद्योगिक परिसरातही या कारवाईने खळबळ उडाली आहे. बनावट टाकी तयार करणाऱ्या प्लास्टो लाईन कंपनीची खातरजमा करून या संदर्भाने दिल्ली उच्च न्यायालयाद दावा दाखल करून कंपनीने कारवाई केल्याचे प्लास्टो कंपनीचे कोल्हापूर येथील मार्केटिंग मॅनेजर जीवन डोंगळे यानी सांगितले.









