प्रतिनिधी /बेळगाव
शहरातील जलवाहिन्यांच्या गळतीकडे प्रशासनाचे आणि एल ऍण्ड टी कंपनीचे दुर्लक्ष झाले आहे. अशातच कुवेंपुनगर येथे घरोघरी जोडणी केलेल्या जलवाहिनीच्या माध्यमातून प्रत्येक घरासमोर गळती लागली आहे. त्यामुळे मोठय़ा प्रमाणात पाणी वाया जात असून, या प्रकाराकडे दुर्लक्ष झाले आहे. गळती निवारणासाठी आवश्यक उपाययोजना राबवावी, अशी मागणी होत आहे.
शहर आणि उपनगरांमध्ये जलवाहिन्यांना गळती लागून मोठय़ा प्रमाणात पाणी वाया जात आहे. गणपत गल्ली कॉर्नरजवळ एकाच ठिकाणी तीन व्हॉल्व्ह असून दोन व्हॉल्व्हद्वारा पाणी वाया जात आहे. दररोज शेकडो लिटर पाणी रस्त्यावरून वाहत असल्याने नागरिकांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे. बाजारपेठेतून ये-जा करणाऱया वाहनांमुळे पादचाऱयांच्या अंगावर पाणी उडण्याचा प्रकार सुरू आहे. या प्रकाराकडे एल. ऍण्ड टी. कंपनीचे दुर्लक्ष झाले आहे. अशातच आता घरोघरी जोडणी केलेल्या जलवाहिनीद्वारे पाणी वाया जाण्याचा प्रकार निदर्शनास आला आहे.
कुवेंपूनगर येथे घरोघरी नळजोडण्या देण्यात आल्या आहेत. पण नळजोडणी करण्यात आलेल्या ठिकाणी गळती लागली असल्याने पाणी वाया जात आहे. प्रत्येक घरासमोर गळती लागली असून, नळजोडणी करण्यात आलेली जलवाहिनी व्यवस्थित बसविण्यात आली नसल्याने हा प्रकार घडला असल्याचे निदर्शनास आले आहे. दहा ते बारा घरांसमोर जलवाहिनीद्वारे पाणी वाया जात असून, दुरूस्तीच्या दृष्टीने येथील रहिवासी आणि पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱयांनी देखील दखल घेतली नाही. त्यामुळे पाणीपुरवठा सुरू असताना मोठय़ा प्रमाणात पाणी वाया जाते. त्यामुळे या गळतीकडे लक्ष देवून दुरूस्त करण्याची गरज आहे. यासाठी पाणीपुरवठा विभाग आणि एल ऍण्ड टी कंपनीच्या अधिकाऱयांनी कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.









