आंतरराष्ट्रीय न्यायालयाची सतावतेय भीती
वृत्तसंस्था/ इस्लामाबाद
पाकिस्तानची संसदीय समिती तुरुंगात कैद भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांच्या मृत्युदंडाची समीक्षा करणार आहे. नॅशनल असेंबलीच्या कायदा आणि न्याय विषयक स्थायी समितीने जाधव यांना मृत्युदंड ठोठावण्याच्या निर्णयाची समीक्षा करण्याचा निर्णय घेतला आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या भीतीने पाकिस्तानच्या समितीने हा निर्णय घेतल्याचे मानले जात आहे.
पाकिस्तानच्या सैन्य न्यायालयाने कुलभूषण यांना मृत्युदंड ठोठावला आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने पाकिस्तानला स्वतःच्या निर्णयाची समीक्षा करण्यास सांगितले आहे. भारतीय नागरिक कुलभूषण यांचा खटला लढविण्यास पाकिस्तानी वकिलांनी स्पष्ट नकार दिला आहे. पाकिस्तान सरकारने यापूर्वी कुलभूषण यांची बाजू मांडण्यास भारतीय वकिलांना मंजुरी देण्यास नकार दिला आहे.
कुलभूषण यांच्या प्रकरणी भारतीय वकील किंवा क्वीन कौन्सिल नियुक्त करण्याची भारताची मागणी पाकिस्तानने यापूर्वीच फेटाळली आहे. पाकिस्तानी न्यायालयात केवळ पाकिस्तानातील वकिलीचा परवाना असलेले वकीलच उपस्थित राहू शकतात असा दावा करण्यात आला. तर लॉर्ड चॅन्सेलरच्या शिफारसीवर ब्रिटिश महाराणीसाठी नियुक्त करण्यात आलेला अधिवक्त्याला क्वीन्स कौन्सिल म्हटले जाते.
पाककडून अध्यादेश
तत्पूर्वी पाकिस्तानच्या संसदेने जाधव यांना उच्च न्यायालयात दाद मागण्याची संधी देणाऱया अध्यादेशाला 4 महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या आदेशावर पाकिस्तानने हा अध्यादेश आणला होता. जाधव यांना राजनयिक संपर्क नाकारण्यात आल्याने भारताने 2017 मध्ये पाकिस्तानच्या विरोधात आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेतली होती.









