इस्लामाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय, भारताला दिला अधिकार
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
पाकिस्तानच्या कारागृहात असणारे भारताचे नागरिक कुलभूषण जाधव यांच्यासाठी वकील देण्याची अनुमती भारताला द्यावी, असा आदेश इस्लामाबाद येथील उच्च न्यायालयाने पाकिस्तान सरकारला दिला आहे. या प्रकरणी पुढील सुनवणी आता 3 सप्टेंबरला घेण्यात येणार आहे.
जाधव यांच्यासाठी वकीलाची नियुक्ती करावी, अशी मागणी करणारी याचिका पाकिस्तान सरकारने 22 जुलैला इस्लामाबाद उच्च न्यायालयात केली होती. या याचिकेवर दोन सदस्यीय खंडपीठासमोर सुनावणी होत आहे. भारताशी चर्चा न करताच ही याचिका पाकिस्तानने एकतर्फी सादर केली आहे.
भारताच्या बाजूने निर्णय
जाधव यांचे पाकिस्तानने अफगाणिस्तानातून अपहरण केले होते. त्यानंतर त्यांच्यावर पाकिस्तानात गुप्तहेरगिरी केल्याचा आरोप ठेवून त्यांच्यावर अभियोग चालविण्यात आला. त्यांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली होती. ही सर्व प्रक्रिया बेकायदेशीर असून जाधव यांच्या बचावाची पुरेशी संधी देण्यात आलेली नाही. तसेच आंतरराष्ट्रीय कायद्यांचा प्रथांचा भंग पाकिस्तानकडून करण्यात आला आहे, असा आरोप करत भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागितली होती. या न्यायालयाने फाशीच्या शिक्षेला स्थगिती देऊन भारताच्या बाजूने निर्णय दिला हाता.
पाकचा कांगावा
फाशीच्या शिक्षेविरोधात जाधव यांनी फेरविचार याचिका सादर करण्यास नकार दिला होता, असा दावा पाकिस्तान करीत आहे. भारताने हा दावा फेटाळला आहे. आता इस्लामाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पाकिस्तानची काय प्रतिक्रिया होते याकडे भारताचे लक्ष लागले आहे. पाकिस्तानने केवळ न्याय देण्याचे नाटक चालविले आहे, असा आरोप भारताच्या परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्याने केला आहे.









