वृत्तसंस्था/ बेंगळूर
पूर्ण तंदुरुस्त झालेला अष्टपैलू अक्षर पटेलचा लंकेविरुद्ध येथे होणाऱया दुसऱया कसोटीसाठी भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. डावखुरा स्पिनर कुलदीप यादवच्या जागी त्याला घेण्यात आले. येत्या शनिवारपासून या कसोटीला सुरुवात होणार आहे.
त्याच्या समावेशामुळे आता भारतीय संघव्यवस्थापनाने कुलदीप यादवला मुक्त केले आहे. अक्षरच्या पायाच्या नडगीला दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे त्याला दक्षिण आफ्रिका दौरा व विंडीजविरुद्धची टी-20 मालिका हुकली होती. याशिवाय अलीकडेच त्याला कोरोनाची लागणही झाली होती. ‘अक्षर पटेल हीच आमची पहिली पसंती होती. पण तो दुखापतीतून पूर्णपणे सावरला नव्हता. त्यामुळे कुलदीपला बॅकअप म्हणून संघात घेतले होते,’ असे बीसीसीआयमधील सूत्राने सांगितले. ‘तो आता फिट होऊन संघात परतल्याने कुलदीपची मुक्तता करण्यात आली आहे,’ असेही या सूत्राने सांगितले.
लंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी संघाची घोषणा करण्यात आली, त्यावेळीच बीसीसीआयने अक्षर पटेल दुसऱया कसोटीसाठी उपलब्ध होईल, असे स्पष्ट पेले होते. फेब्रुवारी 2021 मध्ये कुलदीपने शेवटची कसोटी खेळली होती. भारताने लंकेविरुद्धची पहिली कसोटी एक डाव 222 धावांनी जिंकून मालिकेत आघाडी घेतली आहे.









