वडिलोपार्जित घर-जमिनीच्या वादातून वरकुटे-मलवडीत घटना, सख्ख्या भावासह पुतण्याला अटक
प्रतिनिधी/ म्हसवड
वरकुटे मलवडी (ता. माण) येथील दोन भावात जमीन व घरातल्या वाटणीवरुन अनेक वर्षांपासून वाद होते. या वादाची ठिणगी सोमवारी रात्री साडे अकराच्या सुमारास ज्वारी पिकाला पाणी देण्यासाठी गेलेल्या 75 वर्षीय थोरल्या भावाला 65 वर्षीय लहान भावाने व 28 वर्षीय पुतण्याने शेतातुन पाणी नेहण्यास नकार दिल्याच्या कारणाने कुऱहाडीने, काठीने, दगडाने मारहाण केल्याने थोरल्या भावाचा मृत्यू झाला. याबाबत म्हसवड पोलिसांत मयत अण्णा वाघमोडे यांचा मुलगा सदाशिव वाघमोडे यांनी चुलते मारुती वाघमोडे व त्याचा मुलगा आबा वाघमोडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी त्या दोघांना अटक केली असुन अधिक तपास एपीआय बाजीराव ढेकळे करीत आहेत.
याबाबत मिळालेली माहिती अशी, माण तालुक्यातील वरकुटे मलवडी गावातील मिसाळवस्ती नजीक राहत असलेल्या आण्णा धुळा वाघमोडे व मारुती धुळा वाघमोडे या दोन भावांमध्ये घराच्या वाटणीवरुन व एक एकर क्षेत्रावरून गेले अनेक वर्षांपासून वाद होते. अनेकवेळा मारामारीही झाल्या होत्या.
सोमवारी आण्णा वाघमोडे व त्यांचा मुलगा सदाशिव, त्यांची पत्नी आळंदा, मुलगी संध्या, नातु हर्षद अशा आमच्या कुटुंबाने रात्री 9 वाजता एकत्र जेवून केले. त्यानंतर वडिल आण्णा वाघमोडे रात्री 10 वाजता गावंदरे नावाच्या आमच्या शेतातील शिवारात पेरलेल्या ज्वारीला भिजवण्यासाठी गेले होते. परिसरातील सर्वजण झोपले असताना रात्री 11.15 च्या दरम्यान त्या ठिकाणी त्यांचा धाकटा भाऊ मारुती व त्यांचा मुलगा आबा आले. यावेळी आण्णा वाघमोडेंना झोपेतुन उठवून तु आमच्या शेतीला तुझ्या शेतातुन पाणी नेऊ दे असे मारुती म्हणाले. त्यावर आण्णा वाघमोडे म्हणाले, आधी घराची जागा वाटुन दे, मगचं माझ्या शेतातुन पाणी नेहुन देतो, असे म्हटल्यावर रागाच्या भरात धाकटा भाऊ मारुती याने थोरला भाऊ आण्णा यास दगडाने व काठीने मारहाण केली. तसेच मारुती यांच्या मुलाने हातातील कुऱहाडीने डोक्यात घाव घालून आण्णा वाघमोडे यास ज्वारीच्या पिकात झोपलेल्या जागी रक्ताच्या थारोळ्यात टाकून निघून गेले.
दरम्यान, रात्री 11.45 च्या दरम्यान गावातील जीवन वाघमोडे याने सदाशिव यास फोनवरुन झालेल्या घटनेची माहिती दिली असता आण्णा यांचा मुलगा सदाशिव व मुलगी उषा हे मोटार सायकलवरुन शेतात गेले. यावेळी वडील रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. तातडीने आण्णा वाघमोडे यांना म्हसवड येथील संचित हॉस्पीटल येथील डॉ. गावडे यांचे येथे नेहले असता डॉ. गावडे यांनी आण्णा वाघमोडे मयत झाल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान धाकले बंधू मारुती व त्यांचा मुलगा आबा यांचेवर सदाशिव आचरणात वाघमोडे यांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असुन मारुती व आबा या दोघांना म्हसवड पोलिसांनी ताब्यात घेतले असुन या घटनेचा तपास एपीआय बाजीराव ढेकळे करीत आहेत.
म्हसवड येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे पोष्टमार्टम रुम मोडकळीस आल्याच्या कारणास्तव पोष्टमार्टम करणे म्हसवड आरोग्य केंद्राने बंद केल्याने वरकुटे मलवडी येथील आण्णा वाघमोडे यांचा मृतदेह दहिवडी येथे सकाळी 11 वाजता पाठवला होता. तो सायंकाळी सहा वाजता वरकुटे मलवडी येथे आणण्यात आला. रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले.








