बकरी ईदसाठी बाराईमामजवळील सोहेल जमादार यांच्याकडून खरेदी
192 किलो वजन अन् धष्टपुष्ट शरीरामुळे बकऱ्याला उंची किंमत
संग्राम काटकर / कोल्हापूर
बकरी ईद आली की कुर्बानीची चर्चा रंगू लागते. कुर्बानीसाठी कोणी किती हजार रुपयांचा बकरा आणला आहे, याची वार्ता तर वाऱ्यासारखी पसरते. आज (दि. 21) साजरी होणाऱ्या बकरी ईदला कुर्बानीसाठी बाराईमाम तालीमजवळील सोहेल जमादार यांनी आणलेल्या बकऱ्याची चर्चा सर्वत्र रंगत आहेत. या बकऱ्याची तब्बल 1 लाख 10 हजार रुपये किंमत आहे. 192 किलो वजन, उठावदार तपकीरी रंग, वक्राकार शिंगं आणि धष्टपुष्ट शरीर या वैशिष्ट्यांमुळेच बकऱ्याच्या उंची किंमत मोजली आहेत. शहरातील अन्य सातशेहून मुस्लिम बांधवांनीही 30 ते 40 हजार रुपये मोजून बकऱ्याची खरेदी केली आहे. त्यांचे वजन 40 ते 45 किलोपर्यंत आहे. बकरी ईदकडे कुर्बानीचा उत्सव म्हणून पाहिले जाते. इस्लामिक मान्यतेनुसार मुस्लिम बांधव बकऱ्याची योग्य ती काळजी घेऊन त्याची कुर्बानी देतात.
कुर्बानी देण्यामागे अशी आहे हकीकत
इस्लाम धर्मातील प्रमुख पैगंबरांपैकी एक असलेले हजरत इब्राहिम यांच्यामुळे कुर्बानीची परंपरा सुरू झाली. अल्लाहने इब्राहिम यांच्या स्वप्नात जाऊन त्यांना प्रिय वस्तू कुर्बान करण्यास सांगितले. त्यानुसार इब्राहिम यांनी आपला प्रिय मुलगाच कुर्बान करण्याचे ठरवले. कुर्बानीवेळी मुलावरील प्रेम आड येऊ नये, म्हणून त्यांनी डोळ्यांना पट्टी बांधून कुर्बानी दिली. यानंतर डोळ्यांवरील पट्टी काढल्यानंतर मात्र इब्राहीम यांना मुलगा खेळताना दिसला. तसेच मुलाच्या जागी `दुंबा’ म्हणजे बकरा कुर्बान झाल्याचेही दिसले. या घटनेपासूनच बकऱ्याची कुर्बानी देण्याची परंपरा रुढ झाली ती आजपर्यंत सुरुच आहे.
कुर्बानीसाठीच्या बकऱ्याचा बाजार गेल्या काही दशकांपासून मिरज, देवनार (मुंबई) व कर्नाटकातील निपाणी, रायबाग, मुधोळ येथे मोठ्या प्रमाणात भरत आहे. यंदा कोरोनामुळए सर्वच ठिकाणी भरणाऱ्या बकऱ्याच्या बाजाराला मर्यादा आली आहे. त्यामुळे बकरी ईदसाठी कोल्हापुरातील बहुतेक मुस्लिम बांधवांनी कुर्बानीचा बकरा वैयक्तिकस्तरावर खरेदी संपर्क साधून खरेदी केली आहे. अनेकांनी तर परगावातील बकऱ्याच्या मालकांकडे जाऊन बकरे खरेदी केले आहे. या खरेदी केलेल्या बकऱ्यांपैकी सोहेल जमादार यांनी रायबागमधून खरेदी केलेल्या 1 लाख 10 हजारांच्या बकऱ्याची चर्चा फक्त कोल्हापूरातच नव्हे तर पुणे, मुंबईपर्यंत पोहोचली आहे. चार दिवसांपूर्वी मुंबई आणि बेंगळूरमधील काही धनिक मुस्लिम बांधवांनी जमादार यांचा संपर्क नंबर मिळवून त्याच्याकडील बकऱ्याची 2 ते 3 लाख रुपयांना मागणी केली होती. मात्र जमादार यांनी कुर्बानीसाठी घेतलेले बकरे जादा पैशाच्या लालसेपोटी देऊ शकत नाही, असे त्यांना सांगितले आहे.
बदाम, पिस्ता, काजू भरवून बकऱ्याचे पालन
सोहेल जमादार यांनी खरेदी केलेले बकरे दोन वर्षे असून ते अजमेरी जातीचे आहे. त्याची उंची चार फुट आहे. त्याला गेल्या वर्षभरातून रोज बदाम, पिस्ता, काजू व सहा लिटर दुध खायला दिले जाते. त्यामुळेच त्याचे वजन 192 किलोपर्यंत वाढले आहे.
सोहेल जमादार (रा. बाराईमाम तालीम)