कुर्डुवाडी/प्रतिनिधी
शुक्रवार दि.३१ रोजी कुर्डुवाडी येथे नव्याने ५ कोरोनाबाधितांची वाढ झाली असून कुर्डुवाडीतील बाधितांचा आकडा ३३ झाला आहे.
येथील पटेलचौक परिसरातील एकाच कुटुंबातील चौघा जणांना तर सिद्धार्थ नगर मधील एका मुलाला असे एकूण पाच जणांना कोरोनाची बाधा झाली असल्याचे वैद्यकीय अधिक्षक डाॅ.संतोष अडागळे यांनी सांगितले. संबंधित रुग्णाच्या संपर्कातील लोकांची माहिती घेणे चालू असून सदर परिसर कंटेन्मेंट झोन करुन प्रतिबंधित करण्यात आला आहे.
गेल्या २७ तारखेनंतर शहरात एकही बाधित रुग्ण आढळला नव्हता. त्यामुळे गेली चार दिवस साखळी खंडित झाल्याचा नागरिकांना व प्रशासनाला मोठा दिलासा मिळाला होता. परंतू आज सापडलेल्या बाधितांमुळे प्रशासनाची पुन्हा एकदा झोप उडाली आहे.