कुर्डुवाडी / प्रतिनिधी
कुर्डुवाडी – बार्शी रोडवर ट्रॅक्टर आणि सायकलच्या धडकेत बिगारी मजूराचा जागीच मृत्यू झाला आहे. हबीब सुलेमान शेख वय ३७ रा.अकुलगाव असे या मजूराचे नाव आहे. ही घटना दि.२८ रोजी रात्री कुर्डुवाडी – बार्शी रोडवर एका हॉटेलसमोर ८.४५ च्या सुमारास घडली.
याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, टेंभुर्णीकडून बार्शीकडे भरलेल्या उसाच्या दोन ट्रॉल्या (एम एच ४५ ए ६४५४) आणि दुसरी नंबर नसलेली ट्रॉली घेऊन ट्रॅक्टर हेड क्र.एम एच ४५ एफ ८३९८ जात होता. या ट्रॅक्टरची आणि सायकलवरून कुर्डुवाडीकडून अकुलगावकडे जाणाऱ्या बिगारी मजूरामध्ये विचित्र अपघात झाला. यामध्ये सायकलस्वार ट्रॅक्टर खाली येऊन जागीच ठार झाला.
अतिशय गरीब आणि हालाखीच्या परिस्थितीत प्रामाणिकपणे बिगारी काम करणाऱ्या हबीबचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने अकुलगाव व परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. कुर्डुवाडी पोलिसांत या अपघाताची नोंद घेणेचे काम रात्री उशिरापर्यंत चालू होते.
Previous Articleपतीने केला धारदार शस्त्राने पत्नीवर वार
Next Article चंद्रप्रकाशामुळे सुरमई महागली









