सांगे उपजिल्हाधिकारी, मामलेदारांकडून पाहणी, आज बैठक
प्रतिनिधी / सांगे
साळावली जलाशयातील कुर्डी येथे मोठय़ा प्रमाणात लोक सहलीसाठी येत असून दारू पिऊन दंगामस्ती करत असतात. लोकांच्या मोठय़ा गर्दीमुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती असल्याचे वृत्त वर्तमानपत्रांत तसेच समाजमाध्यमांत प्रसिद्ध झाल्यानंतर गुरुवारी संध्याकाळी सांगेचे उपजिल्हाधिकारी सागर गावडे, मामलेदार मनोज कोरगावकर यांनी अन्य सरकारी अधिकाऱयांसह कुर्डी गावाला भेट दिली व एकूण पाहणी केली. आज शुक्रवारी दुपारी 3 वा. जलस्रोत खात्याच्या अभियंत्यांबरोबर उपाययोजना करण्यासाठी बैठकीचे आयोजन केल्याची माहिती मामलेदार कोरगावकर यांनी दिली आहे.
या प्रकाराची सांगेच्या प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. सध्या कोरोना महामारीत मोठय़ा संख्येने सहली आणि जेवणासाठी लोक एकत्र येणे बरोबर नाही. दुसरीकडे धरणाच्या जलाशयात कोणतेही कृत्य करण्यास प्रतिबंध आहे. मात्र येथे जलस्रोत खात्याच्या मवाळ धोरणाचा लोक फायदा घेत आहेत, असे दिसून येत आहे. सांगेचे मामलेदार कोरगावकर यांनी तलाठी आणि कर्मचाऱयांना तीन दिवसांपूर्वी कुर्डी येथे पाठवून वस्तुस्थिती जाणून घेतली होती.
संबंधित खाते प्रमुखांबरोबर बैठक घेऊन उपजिल्हाधिकारी निर्णय घेणार आहेत. यावेळी सांगेचे गटविकास अधिकारी भगवंत करमली, पोलीस निरीक्षक सचिन पन्हाळकर, जलस्रोत खात्याचे प्रतिनिधी, तलाठी दामू इत्यादी हजर होते. यावेळी समाजमाध्यमातून एका थडग्यासंदर्भात व्हिडीओ व्हायरल झाल्याने त्याचीही पाहणी केली गेली. तसेच ते जुने की नवीन याची खातरजमा करून घेतली गेली. तेथेही गर्दी व कार्यक्रम वाढता कामा नयेत म्हणून खबरदारी घेण्यात येणार आहे. तसेच श्री सोमेश्वर मंदिर व इतर परिसराची पाहणी केली गेली. यावेळी संचारबंदीचे काटेकोरपणे पालन करण्याची गरज व्यक्त करण्यात आली.









