मगो अध्यक्ष दीपक ढवळीकर यांचे आवाहन : डॉ.केतन भाटीकर यांच्या उमेदवारीचे संकेत
प्रतिनिधी/ फोंडा
राज्यात भाजपाला टक्कर देण्याची ताकद केवळ मगो पक्षात असून तोच भाजपाला सक्षम पर्याय ठरु शकतो. पक्षाची नव्याने बांधणी करताना तरुण व महिलांची संघटना सर्व बाराही तालुक्यात उभरणार असून त्याची सुरुवात येत्या 15 जानेवारीपासून म्हार्दोळ येथील श्री महालसा देवीला श्रीफळ ठेऊन होणार आहे. डॉ. केतन भाटीकर यांनी फोंडय़ातून हे कार्य सुरु केलेलेच आहे आणि जिल्हा पंचायत निवडणुकीत कुर्टीच्या विजयातून त्याला यशही मिळाले आहे. आता विधासभा निवडणुकीत फोंडा मतदार संघावर झेंडा रोवण्यासाठी सज्ज होण्याचे आवाहन मगो पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी केले.
मगो पक्षाचे फोंडय़ातील नेते डॉ. केतन भाटीकर यांच्या वाढदिनाचे औचित्य साधून प्रभूनगर-फोंडा येथील रविवारी आयोजित केलेल्या कार्यकर्त्यांच्या स्नेहमेळाव्यात ते बोलत होते. सकाळच्या सत्रात महारक्तदान शिबीर तर दुपारच्या सत्रात रोबोटिक प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन असे विविध उपक्रम आयोजित करण्यात आले होते. दीपक ढवळीकर यांच्याहस्ते दीपप्रज्वलीत करुन या स्नेहमेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर डॉ. केतन भाटीकर, ज्येष्ठ पदाधिकारी मोहन वेरेकर, फोंडा गटाध्यक्ष अनिल नाईक, जि. पं. सदस्य प्रिया च्यारी, नगरसेविका अमिना नाईक, गिताली तळावलीकर, पंचसदस्य भिका केरकर, शर्मिला सांगावकर, मंगेश कुंडईकर आदी उपस्थित होते.
मगो हाच भाजपाला सक्षम पर्याय देईल
जिल्हा पंचायत निवडणुकीत कुर्टीतील मगोच्या विजयाचे श्रेय डॉ. केतन भाटीकर यांना देत, फोंडा मतदार संघ जिंकण्यासाठी आत्तापासूनच जोमाने कार्य सुरु ठेवण्याचे आवाहन दीपक ढवळीकर यांनी केले. कार्यकर्ते पक्षाशी एकनिष्ठ व तटस्थ राहून कार्य करतील, तेव्हाच पक्ष मोठा होईल. मगो हा राज्यातील सर्वात जूना व आजही जनतेच्या मनात स्थान असलेला पक्ष आहे. पक्षाच्या तिकिटावर निवडून आलेल्या आमदारांच्या दगाबाजीमुळेच आज पक्षाची वाताहत झाली आहे. मगोने आमदार निवडून द्यायचे व काँग्रेसने ते पळवून न्यायचे हाच इतिहास काय असून ज्या मगोच्या आधारावर भाजप मोठा झाला, त्यांनीही कायम दगा दिला अशी टिकाही ढवळीकर यांनी केली. सध्य परिस्थितीत मगोशिवाय गोव्याला पर्याय नाही, हे जनतेला पटवून देण्यासाठी तरुण कार्यकर्त्यांनी पुढे येण्याचे आवाहन त्यांनी केले.
पक्षाची निवडणूक जानेवारीत
विरोधकांनी पक्षातील काही लोकांना हाताशी धरुन मगोत फुट घालण्याचे पुन्हा एकदा षड्यंत्र रचले आहे. मगो हा घटनेनुसार चालणारा पक्ष असल्याने त्यानुसार येत्या जानेवारी-फेब्रुवारीमध्ये केंद्रीय समितीची रितसर निवडणूक होणार आहे. त्यानंतर पक्षाचा अध्यक्ष कोण राहणार हे ठरविण्याचा पूर्ण अधिकार आमसभेला असेल असेही त्यांनी स्पष्ट केले.
फोंडय़ात डॉ. भाटीकर हेच योग्य उमेदवार : मोहन वेरेकर
फोंडा मतदार संघात मगो पक्षाची विस्कटलेली घडी नव्याने बांधण्यासाठी व युवा संघटना उभारण्यासाठी डॉ. केतन भाटीकर यांचे योगदान मोठे आहे. सध्या त्यांचे कार्य पाहिल्यास येणाऱया विधानसभा निवडणुकीत मगो पक्षाचे ते निर्विवाद उमेदवार आहेत. गेल्या चार वर्षापासून पक्ष विस्ताराबरोबरच जनतेचे विविध प्रश्न ते सातत्याने मांडीत असतात. मगो नेता म्हणून त्यांनी जनतेच्या मनात स्थान मिळविले आहे. फोंडय़ात त्यांचा विजय निश्चित आहे, असे मोहन वेरेकर यांनी सांगितले. भिका केरकर यांनीही डॉ. केतन भाटीकर हेच मगोचे फोंडय़ातील उमेदवार असतील असे सांगून पक्षाच्या वरिष्ठाने दुसरा विचार न करता त्यांचे नाव जाहीर करण्याची मागणी केली. डॉ. भाटीकर यांच्या नेतृत्वाखाली मगो पक्ष नव्या जोमाने व तरुण उत्साहात कार्य करीत आहे. सरकारात नसतानाही जनतेसाठी सध्या ते ज्या पद्धतीने काम करीत आहेत, ते पाहता फोंडय़ाचे आमदार म्हणून विधानसभेवर निवडून जाणे आवश्यक आहे. प्रिया च्यारी, निधी मामलेकर, गिताली तळावलीकर, मंगेश कुंडईकर यासह अन्य कार्यकर्त्यांनीही डॉ. भाटीकर यांच्या उमेदवारीवर जोर दिला.
आता लक्ष्य विधानसभा : डॉ. भाटीकर
आपले मनोगत व्यक्त करताना डॉ. भाटीकर म्हणाले, कुर्टी जिल्हा पंचायतीचा विजय ही सुरुवात असून पुढील लक्ष्य हे विधानसभा निवणूक असेल. जिल्हा पंचायतीच्या निवडणुकीत कुर्टीतील विजयाचे संपूर्ण श्रेय कार्यकर्त्यांना देऊन, यापुढे फोंडा मतदार संघ जिंकण्यासाठी अधिक जोमाने कार्याला लागण्याचे आवाहन त्यांनी केले. मंगेश कुंडईकर व विराज सप्रे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.









